राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील मानेपुरी ग्रामपंचायतीच्या वतीने पालकमंत्री पांदण रस्ता योजनेमधून केल्या जात असलेल्या रस्त्याचे काम निधीअभावी रखडले आहे. उर्वरित अपूर्ण काम करण्यासाठी सदरील योजनेला निधी देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
शेतकऱ्यांना शेतीच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्याची सुविधा व्हावी, याकरिता मानेपुरी ग्रामपंचायतीने पालकमंत्री पांदण रस्ता योजनेअंतर्गत शेत- शिवारामधील रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळविली. यामध्ये तळेगाव ते मानेपुरी शिव, पानेगावकडे जात असलेली गाडी वाट व इतर तीन ठिकाणी अशा पाच ठिकाणी पांदण रस्त्याच्या कामाला नोव्हेंबर २०१९ मध्ये सुरुवात झाली होती. प्रत्येक ठिकाणी एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या कामासाठी मातीकाम पूर्ण केले आहे. मातीकाम पूर्ण झालेल्या रस्त्यावर खडीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. परंतु, सद्यस्थितीत या योजनेला निधी नसल्यामुळे रस्त्याचे काम अर्धवट झाले आहे.
फोटो ओळ : मानेपुरी ते तळेगाव या शिवरस्त्याचे मातीकाम करण्यात आलेले आहे. परंतु, आता निधी नसल्याने सदरील रस्त्याला खडीकरणाच्या कामाची प्रतीक्षा आहे.