जालना : शहरातील बडीसडक रस्त्यावरील दधीमाता मंदिरास सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र अग्रवाल यांनी दानपेटी भेट देऊन बसवून घेतली आहे. दानपेटी देताना राजेश अग्रवाल, दीपक भरतीया, दीपक दायमा, संतोष लाड, रमेश काळे आदींची उपस्थिती होती. याबद्दल अग्रवाल यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.
बागल परिवारच्यावतीने रक्तदान शिबिर
परतूर : बागल परिवाराच्यावतीने शहरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात १३४ जणांनी रक्तदान केले. ॲड. माणिक काळे, शंकर पवार यांच्याहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. जालना येथील जनकल्याण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी शिवराज जाधव व त्यांच्या पथकाने रक्त संकलन केले. रक्तदान शिबिर घेण्यामागील उद्देश विशाल बागल यांनी सांगितला.
सेवानिवृत्तीबद्दल बोर्डे यांचा गौरव
दाभाडी : बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथील शिवाजी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सुधाकर बोर्डे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. याबद्दल शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला. बोर्डे शिवाजी विद्यालयात ५ नोव्हेंबर १९९० रोजी कार्यरत झाले होते. त्यांच्या कार्यकाळातील बहुतांशी विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात तालुकास्तरीय ते राज्यपातळीपर्यंत क्रीडा क्षेत्राची चुणूक दाखविली आहे.
जालना शहरात कुत्र्यांचा उपद्रव वाढला
जालना : शहर परिसरात मागील काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. अनेकदा कुत्रे दुचाकींसह इतर वाहनांमागे धावतात. त्यामुळे अपघात घडण्याची भीती नाकारता येत नाही. शहरातील भोकरदन नाका, शनी मंदिर, गांधी चमन, औरंगाबाद चौफुली, लक्कडकोट, चंदनझिरा आदी परिसरात रात्री मोकाट कुत्रे फिरतात. वेळीच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून होत आहे.
जगताप यांचा गौरव
जालना : शहरातील जेईएस कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक टी. आर. जगताप नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. याबद्दल शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी संघटनेचे विभागीय सचिव व्ही. बी. गौड, बी. जी. सोळुंके, शेख अब्बास, अशोक झिने, महेश लोकलकर, विलास खरवडे आदींची उपस्थिती होती. सोळुंके यांनी जगताप यांच्या कार्याविषयी माहिती दिली.
रस्त्याची दुरवस्था
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री ते भांबेरी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. असे असतानाही रस्त्याचे काम करण्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे मध्यंतरी सदरील रस्त्याचे काम सुरू झाले होते; परंतु परत काम बंद पडले असल्याने ग्रामस्थांमधून तर्क- वितर्क लावले जात आहेत. वेळीच रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे.