जालना : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेत पंप मिळालेल्या शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. यासाठी तक्रार कुठे करायची याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, सौर कृषी पंपाच्या तक्रारींसाठी ऑनलाईनसह विविध पर्याय उपलब्ध असल्याचे महावितरणने कळवले आहे.
रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
जालना : मंठा चौफुलीजवळील शकुंतलानगर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ७५ जणांनी रक्तदान केले. कोरोना महामारीमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने राज्य सरकारने रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक धोरणावर वेबिनार
जालना : नवीन शैक्षणिक धोरणावर आधारित सरस्वती भुवनच्या माजी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वेबिनार शुक्रवारी आयोजित करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी विद्यार्थी संघाचे संचालक प्रसाद कोकीळ, प्रमोद माने, राम भोगले, सुनील रायठठ्ठा, मुख्याध्यापक मारूती पाटील यांची उपस्थिती राहणार आहेत. माजी विद्यार्थ्यांनी या वेबिनारमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गुरूकुलच्या विद्यार्थ्यांचे यश
जालना : क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत विभागस्तरीय युवक महोत्सव घेण्यात आला. या ऑनलाईन झालेल्या महोत्सवात ओंकारेश्वरच्या संस्कार प्रबोधिनी गुरूकुलमधील उमेश वैद्य या वीणा वादनात प्रथम व सचिन मोरे याने मृदंग वादनात द्वितीय पारितोषिक मिळविले. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महंत बालकगिरी महाराज, रणजीत बोराडे, गणेश महाराज डोंगरे आदींची उपस्थिती होती.