जालना : परवानगी नसतानाही मांजाची विक्री करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले. सय्यद असलम सय्यद युसूफ (३२, रा. टाऊन हॉलजवळ, जुना जालना), असे आरोपीचे नाव आहे. टाऊन हॉल येथे एक जण मांजा विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून सदरील ठिकाणी छापा मारला असता, सय्यद असलम सय्यद युसूफ यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १,५०० रुपयांचा मांजा जप्त करण्यात आला.
नजीक पांगरी शिवारात चार गायींचा मृत्यू
बदनापूर : नजीक पांगरी शिवारातील गट नंबर २१३ मधील गोठ्यात बांधलेल्या गायींवर विजेची तार पडल्याने चार गायींचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. यात शेतकरी सुनील पवार यांचे जवळपास १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठ्याने पंचनामा केला असून, वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. झालेल्या नुकसानीची मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.