वडीगोद्री : अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन हायवांवर उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी कारवाई केली होती. सदरील हायवा २०१९ मध्ये गोंदी पोलीस ठाण्यातील पोलीस वसाहतीत लावण्यात आले होते. कोणतीही कागदपत्रे सादर न करता मालकांनी हायवा चोरून नेले होते. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे दोन्ही हायवा बीड येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे, जमादार अखतर शेख, सुशील करांडे यांनी बीड येथे जाऊन दोन्ही हायवा जप्त केले.
नव्याने लोककला, पथनाट्याच्या निवड सूचीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
जालना : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे शासनाच्या योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी यापूर्वीच्या लोककला आणि पथनाट्य सादर करणाऱ्या संस्थांच्या जिल्हानिहाय निवड सूचीची मुदत २० डिसेंबर २०२० रोजी संपली आहे. आता नवीन निवड सूची तयार करण्यासाठी संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. संबंधित संस्थांना १ जानेवारी २०२१ पासून अर्ज करता येतील; तर अर्ज करण्याची अंतिम मुदत २१ जानेवारी २०२१ ही आहे.
-------
शिबिरात १६ जणांचे रक्तदान
जालना : मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी परिषदेच्या वतीने रक्तदान व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १६ जणांनी रक्तदान केले. तसेच ७१ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत बांदल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शांतीसागर बिरादार, डॉ. फिरोझ अहमद, डॉ. पाल, डॉ. जी. एम. मानकरी, डॉ. वर्षा गिरी, डॉ. रुबिना, डॉ. प्राजक्ता जोशी, डॉ. गजानन अवचार, डॉ. अमित लकडे, उपप्राचार्य प्रा. रवींद्र करवंदे, शाम भोजने, आदींची उपस्थिती होती.