जालना : जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये वाचनसंस्कृती वृद्धिंगत व्हावी, यासाठी जागर उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे-मुंबई येथील दानशूर व्यक्ती व प्रकाशन संस्थेमार्फत उपक्रमशील शाळांसाठी मोफत पुस्तकसंच भेट देण्यात येत आहे. रंगनाथराव पाटील विद्यालय जामवाडी, जिल्हा परिषद शाळा काजळा, सरस्वती विद्यालय गोंदेगाव, रंगनाथ महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघ्रुळ, संस्कार प्रबोधिनी विद्यालय आदी शाळांना मोफत पुस्तकसंच देण्यात आले आहेत.
रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी
अंबड : तालुक्यातील मार्डी- हस्तपोखरी- अंबड या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. या रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे नायब तहसीलदार बाबुराव चंडोल यांच्याकडे केली आहे. निवेदनावर वंचितचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र भोजने, माजी सरपंच ओमप्रकाश राऊत, भाऊराव बनसोडे, गणेश मुंजाळ, बाबासाहेब जाधव, भगवान तायडे, कृष्णा तायडे, राजेंद्र भडक, रामेश्वर मोटकर, बप्पासाहेब पाटील, संदीपान मुंजाळ, शफी पटेल आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, या रस्त्याच्या कामाला गतवर्षी सुरुवात केली होती. त्यावर मातीमिश्रीत मुरूम, खडी तसेच विहिरीचे ढब्बर वापरण्यात आले आहे.
ओकार तोष्णीवाल बीडीएस परीक्षेत उतीर्ण
जालना: शहरातील डॉ. कमलकिशोर तोष्णीवाल यांचा चिरंजीव ओंकार तोष्णीवाल याने बीडीएसच्या परीक्षेत ६५ टक्के गुण मिळवत यश संपादन केले. लातूर येथील महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ डेंटल सायन्स ॲण्ड रिसर्च येथून बीडीएस उतीर्ण झाला आहे. त्याच्या यशाबद्दल राजुरी स्टीलचे उद्योजक कैलास लोय, शिवरतन मुंदडा आदींनी कौतुक केले.
जालना जिल्ह्यातील एटीएममध्ये खडखडाट
जालना : जिल्हाभरातील एटीएटीमध्ये मागील काही दिवसांपासून खडखडाट आहे. यामुळे नागरिकांची चांगलीच ताराबंळ उडत आहे. शुक्रवार ते रविवार अशा सलग तीन शासकीय सुट्या आल्याने पैशांसाठी नागरिक एटीएमकडे वळाले, पण शहरातील बहुतांश एटीएममध्ये रक्कमच उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय झाली. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालनही बँकांकडून केले जात नाही.
विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांची गैरसोय
आष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी गावासह परिसरात विजेचा लपंडाव व भारनियमनामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री शेतात जावे लागत आहे. परिसरातील विजेची गरज पूर्ण करण्यासाठी आष्टी, लोणी, काऱ्हाळा, कोकाटे हदगाव ही चार ३३ केव्ही उपकेंद्र असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे येथे १३२ केव्हीची गरज असून, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
शेतकऱ्यांनी पाळीव जनावरे सोडली कपाशीत
अंबड : अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरात यावर्षी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कपाशीचे पीक जोमात आले होते. परंतु, सततच्या पावसामुळे कपाशीचे मोठे नुकसान झाले. बोंडे सडल्याने दोन वेच्यातच कापूस संपला. तसेच बोंडअळीने थैमान घातल्याने शेतकऱ्यांनी कपाशी उपटून गहू, हरभरा पिकांची पेरणी केली. अजूनही काही शेतकऱ्यांच्या शेतात कपाशीचे पीक उभे आहे. या पिकात जनावरे चरण्यासाठी सोडण्यात आली आहेत.
दाट धुक्याचा कांदा पिकावर परिणाम
जालना : जिल्ह्यात गतवर्षी कांदा बियाण्याला दीड ते दोन लाख रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली आहे. यावर्षी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने कांदा पीक चांगले आले आहे. काही शेतकरी सध्या कांदा लागवड करीत आहेत. मात्र, मागील चार दिवसांपासून ग्रामीण भागात पडत असलेल्या दाट धुक्याचा कांदा पिकावर परिणाम होत आहे. नवीन पाती वाकड्या होत आहेत तसेच कांदा जळून जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कृषी विभागाने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
पशुगणना जाहीर होईना
भोकरदन : तब्बल दोन वर्षांनी हाती घेण्यात आलेल्या २० व्या पशुगणनेचे काम तालुकानिहाय नेमण्यात आलेल्या प्रगणकांनी पूर्ण केले आहे. परंतु, पशुसंवर्धन विभागाकडून पशुगणना जाहीर केली जात नाही.
रस्त्याची दुरवस्था
आष्टी : येथील परतूर - आष्टी रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गतिरोधक उभारावा
जालना : अंबड तालुक्यातील जामखेड येथून बदनापूर ते जामखेड मार्ग गेला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ग्रामस्थांची घरे आहेत. घरातील लहान मुले रस्त्यालगतच खेळत असतात. त्यामुळे रस्त्यावर गतिरोधक उभारावा, अशी मागणी होत आहे.