जालना : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने विविध तयारी सुरू केली आहे. रात्रीच्या वेळी अपघातांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे रिफ्लेकटर लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिले.
मराठा सेवा संघाकडून शिबिराचे आयोनज
जालना : मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड आणि एकता सामाजिक संस्थेच्या वतीने तालुक्यातील विविध ठिकाठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. काही ठिकाणी रक्तदान शिबिरे पार पडली. ६ ही शिबिरे तारखेपर्यंत होत आहेत. दरम्यान, ४ जानेवारी रोजी रांजणी येथील विघ्नहर हॉस्पिटलमध्ये, कुंभार पिंपळगाव येथे ६ जानेवारी रोजी रक्तदान शिबीर होणार आहे.
पाझर संस्था गरजूंना ब्लँकेट वाटप करणार
जालना : उघड्यावर झोपणाऱ्यांना ब्लँकेट वाटप करण्याचे काम संस्थेकडून दरवर्षी केल्या जाते. दरम्यान, या वर्षीही हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी सुनील कुर्हे यांच्या पुढाकारातून सामाजसेवकांना पालकत्व देऊन हा उपक्रम राबवला जात आहे. यासाठी काही जण पालकत्व घेऊन वंचित घटकांसाठी मदत करून ब्लँकेट वाटप करणार आहे.
शौय दिनानिमित्त कार्यक्रम
जालना : येणाऱ्या पिढीत वैचारिक क्रांती निर्माण करणे गरजेचे आहे. लेखणीनेच आपण जगावरच राज्य करू शकतो, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के यांनी केले. जुना जालना येथील समर्थनगर मधील तक्षशिला बुध्दविहारात शौर्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
रस्त्याची दुरवस्था
जालना : तालुक्यातील सोमनाथ फाट्यापासून गावपर्यंत असलेल्या रस्त्याची मागील काही दिवसांपासून मोठी दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. वेळीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
रेल्वे सप्ताहात शेख युसुब यांना पुरस्कार
जालना : शहरातील राज्य पातळीवरील फुटबॉल प्लेयर म्हणून ओळखळे जाणारे रेल्वे विभागातील अधिकारी शेख युसुब यांना उत्कृष्ट काम केल्याबद्ल पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. यावेळी महेंद्रजितसिंग चव्हाण, के. नरसिंगराव, विनोद प्रकाश, सचिव शेख जावेद शेख आदींची उपस्थिती होती. या पुरस्कारबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.
कन्हैयानगर रस्त्यावर खड्डे
जालना : शहरातील जैन हिंदी विद्यालय ते कन्हैयानगर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. रहदारीच्या या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहनधारकांची गैरसोय होत असून, अपघात घडत आहेत. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहे. नगरपालिका विभागाने तात्पुरते खड्डे न बुजवता या रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
रूग्णवाहिकेचे लोकार्पण
अंकुशनगर : अंबड तालुक्यातील शहागड येथे ॲड. नारायण शिंदे मित्रमंडळाच्या वतीने रविवारी रूग्णवाहिका रूग्णांच्या सेवेत सुरू करण्यात आली. या रूग्णवाहिकेचे लोकार्पण गावातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शहागड गावात रूग्णवाहिकेची गरज लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत ही रूग्णवाहिका सुरू करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मुंडे आदींची उपस्थिती होती.
कर्मचाऱ्यांकडून निषेध
जालना : बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यास एजंटाकडून शिवीगाळ तसेच मारहाण झाली. या घटनेचा निषेध व्यक्त करत जालना आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी काम बंद आंदोलन करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. यावेळी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
कामाला मुहूर्त सापडेना
जालना : अंबडपासून मार्डी, हस्तपोखरी ते नागझरीपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाला मंजुरी मिळाली, कामाचे उद्घाटनही थाटामाटात झाले; परंतु, अजुनही कामाला सुरवात झाली नसल्याने वाहनधारकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे रस्त्यावरून वाहने चालवणेही अवघड झाले आहे. या रस्त्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे. रस्त्यावर दगड, मुरूम टाकण्यात आला
आहे. वाहनधारकांना जीवमुठीत धरून वाहने चालवावी लागत
आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
ग्राहक हैराण
जालना : विविध मोबाईल कंपन्यांच्या महागड्या प्लानसाठी पैसे माजूनही ग्रामीण भागात मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. अंबड तालुक्यातील मठपिंपळगावसह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून काही खासगी कंपनीच्या रेंज अभावी ग्राहक वैतागले आहेत. मोबाईल कंपन्या अगोदर वेगवेगळ्या ऑफर देत ग्राहकांना आकर्षित करतात. ग्राहकांची संख्या वाढल्यानंतर महागडे रिजार्च प्लान ग्राहकांच्या माथी मारतात.