जालना : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रूग्णांची संख्या लक्षणीय वाढली आहे. आजघडीला सक्रिय रूग्ण हे जवळपास साडेसात हजार असून, त्यापैकी ५० टक्के रूग्णांना ऑक्सिजनची गरज असल्याचे दिसून आले. जालन्यातील जिल्हा शासकीय रूग्णालयात लिक्वीड ऑक्सिजन साठवणुकीचे दोन २० केएल. क्षमतेचे प्लांट आहेत. येथील रूग्णांना लिक्वीड ऑक्सिजनचा पुरवठा कर्नाटक येथील बेल्लारी स्टील तसेच पुणे येथून टॅंकरव्दारे केला जात असल्याचे सांगण्यात आले. जालना जिल्ह्यात फेब्रवारी आणि मार्चमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. एप्रिलमध्येही रूग्णवाढीचा आलेख उंचावलेलाच आहे. त्यातच दुसऱ्या लाटेत रूग्णांना सर्वाधिक त्रास हा श्वास घेण्यासाठी होत असल्याने ऑक्सिजनची मागणी वाढल्याचे सांगण्यात आले. एकूणच जालन्यातील जिल्हा शासकीय तसेच कोविड रूग्णालय आणि आता नव्याने उभारलेले अग्रसेन फाऊंडेशन याठिकाणी एकूण जवळपास ६००पेक्षा अधिक खाटा आहेत.
या सर्व खाटांना ऑक्सिजन पुरवताना अग्रेसन फाऊंडेशनमध्ये सिलिंडरने पुरवठा केला जात असून, कोविड रूग्णालय आणि जिल्हा शासकीय रूग्णालयातील खाटांना लिक्वीड ऑक्सिजनचा पुरवठा केला जात असल्याचे सांगण्यात आले. या ऑक्सिजनचा पुरवठा तसेच तो योग्य दाबाने रूग्णांना देण्यासाठीच्या कामावर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवले जात असून, या दोन्ही प्लांटचे ऑक्सिजन ऑडिट करून घेण्यासाठी एका समितीची स्थापना केली असल्याचे सांगण्यात आले.
चौकट
बेल्लारी, पुणे येथून ऑक्सिजन पडतोय महागात
बेल्लारी तसेच पुणे येथून हा ऑक्सिजन आणताना तेथेही वेटिंग आहे. परंतु, आपण आधीच संपर्क करून नंतरच टॅंकर पाठवत असल्याने तो उपलब्ध होत आहे. हा ऑक्सिजन आणताना वाहतूक खर्च अधिक होत आहे, परंतु रूग्णांच्या आरोग्यासाठी पैसा हा गौण मानला जात असल्याने हा ऑक्सिजन तेथून मागवला जात असल्याचे सांगण्यात आले.