जालना : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या एका आरोपीस विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास व चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
विजय ज्ञानदेव हर्बक (रा. चापडगाव, ता. घनसावंगी), असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. एक अल्पवयीन मुलगी १० मार्च २०१८ रोजी दुपारी शेतातील विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेली होती. त्यावेळी तेथे आलेल्या विजय हर्बक याने तिचा विनयभंग केला. पीडित मुलीने आरडाओरड करताच तिचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी हर्बक हा तेथून पळून गेला. याप्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकाने दिलेल्या तक्रारीवरून हर्बक विरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर या प्रकरणात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
या प्रकरणाची विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सखाराम गोपाळराव देशमुख यांच्या समोर सुनावणी झाली. या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष व सहायक सरकारी वकील वर्षा एल. मुकीम यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश सखाराम देशमुख यांनी आरोपी विजय हर्बक याला भा.दं.वि. कलम ३५४ मध्ये तीन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि कलम ७ व ८ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तीन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरी, अशी शिक्षा सुनावली, तसेच पीडित मुलीस तीन हजार रुपये देण्याचे आदेश दिल्याची माहिती अॅड. वर्षा मुकीम यांनी दिली.
यांची साक्ष ठरली महत्त्वाची
या प्रकरणात पीडित मुलगी, फिर्यादी, पीडितेची मैत्रीण, नातेवाईक, इतर प्रत्यक्षदर्शी, ठाणे अंमलदार ए.टी. अवसरे, सपोनि. व्ही.सी. राजपूत यांच्यासह इतरांची साक्ष महत्त्वाची ठरली. या प्रकरणात पोलीस नाईक संजू राठोड यांनी साक्षीदारांचे समन्स तालीम करून साक्षीदारांना न्यायालयासमोर हजर केले.