जाफराबाद : महावितरण कंपनीने कृषी पंपधारक शेतकऱ्यांना वीज बिलाचे वाटप न करता अचानक शेती पंपाचा वीज पुरवठा बंद करून ग्राहकांना शॉक दिला आहे. आता एक अजब फतवा काढण्यात आला असून, एका कृषी पंपाच्या जोडणीमागे पाच हजार रुपये भरा असे सांगण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी रक्कम भरणा केला त्या परिसरातील रोहित्र सुरू करण्यात येणार आहेत.
जाफराबाद तालुक्यात १५ हजार शेतकरी संख्या असून, ज्यांची वीज जोडणी नियमानुसार झाली आहे. या शेतकऱ्यांच्या मागे वीज बिले भरण्याचा ससेमीरा महावितरण कंपनीने लावला आहे. त्यात नियमांचे पालन न करता सरसगट एक भरणा करावा, असे तोंडी फर्मान काढले आहेत. महावितरण कंपनीने मागील वेळेस वीज बिलाची वसुली करताना एका वीज जोडणी मागे तीन हजार रुपये भरणा करून घेतला होता. यावेळेस मात्र पाच हजार रुपये वसूल करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची येत्या दोन दिवसात वीज जोडणी न झाल्यास रब्बी हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हातातून जाणार आहेत.
सर्व ग्राहकांना एकच मापदंड
तालुक्यात ग्राहक संख्या कागदोपत्री १५ हजार असली तरी विद्युत पंपाची संख्या या पेक्षा अधिक आहे. त्यात वीज जोडणी किती एचपीची आणि विद्युत पंप कितीचा हा वेगळा विषय आहे. असे असले तरी सर्वच ग्राहकांना सारखाच मापदंड लावण्यात आल्याने ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.