‘माझी वसुंधरा अभियान’ यात शहरी भागात महानगरपालिका व नगरपालिका या यंत्रणेने काम करण्यासाठी आदेशित करण्यात आले आहे. या अभियानात पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश यावर काम करावयाचे आहे. यास गुणांकन देण्यात येणार असून या अभियानात जी महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत उत्कृष्ट काम करेल, त्या कामाची तपासणी होऊन त्यास सन्मानित करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने शहरातील नगर परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले असून, शहरातील सर्व शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी यांनासुद्धा पर्यावरणाचे संरक्षण करण्याबाबत शपथ देण्यात येणार आहे. याचसोबत सौरऊर्जेचा जास्तीत- जास्त वापर करणे, इलेक्ट्रॉनिक बाईकचा वापर करणे, रेन वॉटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती करणे, शहरातील विविध प्रभागांत हरितपट्टे निर्माण करणे, प्रदूषण टाळण्यासाठी सायकलीचा जास्तीत- जास्त वापर करणे, शहरातील मोठ्या नाल्यांची सफाई व आमना नदीचे सौंदर्यीकरण करणे यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांच्यासह नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.