इंधन दरवाढीचा परिणाम : सर्वसामान्यांना फटका
जालना : पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा परिणाम सर्वांनाच सोसावा लागत आहे. या इंधन दरवाढीमुळे खासगी प्रवासी वाहनांनी जवळपास २५ टक्के दरवाढ केली आहे. याचाही फटका आता सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे.
एखादा कार्यक्रम असो किंवा कौटुंबिक सहल असो अनेक नागरिक खासगी वाहन घेऊन जाणे पसंत करतात. त्यात कोरोनामुळे तर खासगी वाहनाद्वारे प्रवास करण्यालाच अनेकांनी पसंती दिली आहे. परंतु, पेट्रोल, डिझेलचे दर शंभरीपार गेल्याने खासगी वाहनचालकांनी आता प्रवासी भाड्यामध्ये २० ते २५ टक्क्यांनी वाढ केली आहे. ही दरवाढ करूनही प्रवासी भाडे परवडत नसल्याची ओरड चालक करीत आहेत. परंतु, या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांनाही बसत आहे.
गाडीचा हप्ता कसा भरणार?
कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधांचा खासगी वाहनधारकांना फटका बसला आहे. अनेकांचे बँक कर्जाचेही हप्ते थकीत आहेत. आता इंधनाचे दर वाढल्याने भाड्याचे दर वाढले आहेत.
- अमोल वाघ
कोरोनाच्या प्रादुर्भावात आम्हा वाहनधारकांचे मोठे हाल झाले आहेत. इंधन दरवाढ, कर्जाचे हप्ते आणि वाहनाची वेळोवेळी करावी लागणारी दुरुस्ती यावरही खर्च वाढला आहे.
- ऋषिकेश रायलकर