जालना : उद्योग व्यवसाय सुरू करून स्वावलंबी बनण्यासाठी कौशल्याची गरज असून, ती मिळविण्यासाठी स्वावलंबी शाश्वत विकास अभियानाचा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे. यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन तज्ञ प्रशिक्षक प्रा. अविनाश खिल्लारे यांनी केले.
धरतीधन ग्राम विकास संस्था आणि कुलस्वामी बेरोजगार सेवा सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जालना येथे आयोजित एक दिवसीय उद्योजकता विकास कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिलिंद सावंत हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाबँक स्वयरोजगार प्रशिक्षण केंद्राचे प्रभारी संचालक अरूण कासार, कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन केंद्राच्या समपुदेशक शमीम बी पठाण, मंकरद जहागिरदार, ज्ञानेश्वर मोकळे, पुष्कराज तायडे, विक्रांत खरडे आदींची उपस्थिती होती.
यावेळी युवक, युवती, शेतकरी व महिला बचत गटातील सदस्यांसाठी प्रशिक्षण घेऊन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वावलंबी शाश्वत विकास अभियानाअंतर्गत एक दिवसीय मोफत उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वावलंबी शाश्वत विकास अभियानाचे अध्यक्ष मिलींद सावंत यांनी दिली. तज्ञ प्रशिक्षक प्रा. खिल्लारे व खरडे यांनी उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, विविध क्षेत्रातील उद्योगाच्या संधी, शासनाचे औद्योगिक धोरण, कंपनीसाठी लागणारे वेगवेगळे नोंदणी परवाने, कृषी उद्योग, लघुउद्योग, गृहउद्योग, नाबार्ड योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना आदींबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिक्षा बोरूडे यांनी तर आभारप्रदर्शन जयंसिंग सिल्लोडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाश्वत विकास अभियानाचे कृष्णा भालेराव, गजानन कदम, अक्षय सावंत, रघुनाथ गोरे आदींनी परीश्रम घेतले.