सातोना खु. येथील चेक पोस्ट वाऱ्यावर :
सातोना खु : परतूर तालुक्यातील सातोना खु. जवळ असलेल्या चेक पोस्टवर पोलीस नसल्याने परभणी जिल्ह्यातून जालना जिल्ह्यात अनेकजण ये-जा करीत आहेत. याकडे दुर्लक्ष आहे.
मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. शिवाय, आंतरजिल्हा प्रवेश बंदी केली आहे. यासाठी जिल्ह्यात २५ ठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात आल्या आहेत. परजिल्ह्यातून येणाऱ्यांना ई-पास असल्याशिवाय प्रवेश न देण्याचे आदेश आहेत. शिवाय, कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार परतूर तालुक्यातील सातोना खु. येथेही जालना- परभणी जिल्ह्यांच्या सीमेवर चेक पोस्ट उभारण्यात आले आहे. या चेक पोस्टवर केवळ दोन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. असे असतानाही चेक पोस्टवर परभणीकडून येणाऱ्यांना विचारपूस केली जात नाही. याकडे पोलीस प्रशासनाचेही दुर्लक्ष दिसत आहे.