कोरोनामुळे आधीच तारीख पे तारीख पडलेली राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा आता रविवारी होत आहे. यासाठी जालना जिल्हा प्रशासनाने आठ परीक्षा केंद्र निवडली आहेत. त्यात खालील केंद्रांत ही परीक्षा होणार आहे. शासकीय तंत्रिनकेतन नागेवाडी - २४०, बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय २४०, सरस्वती भुवन जुना जालना ३६०, एम.एस. जैन इंग्रजी हायस्कूल ३६०, जेईएस महाविद्यालय २८८, एम.एस. जैन मराठी विद्यालय शिवाजी पुतळ्याजवळ - ४३२, सीटीएमके, गुजराती हायस्कूल - २८८, सेंटमेरी हायस्कूल - २४० असे परीक्षा केंद्रनिहाय विद्यार्थी आहेत.
या परीक्षेसाठी परीक्षार्थींना हँडग्लोव्हज, सॅनिटायझरची छोटी बाटली देण्यात येणार आहे. तसेच परीक्षेपूर्वी आणि नंतर परीक्षा केंद्राचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. हे काम एका दिल्ली येथील खासगी कंपनीला देण्यात आले आहे.
चौकट
तापेची लागण असलेल्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था
कोरोना काळात होणाऱ्या या परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना जर ताप, खोकला अथवा कोरोनाची अन्य लक्षणे असल्यास त्यांची स्वतंत्र हॉलमध्ये व्यवस्था केली आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह असल्यास पीपीई किट घालून परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली आहे. यासाठी महसूल तसेच पोलिसांनी सर्व ती तयारी केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी दिली आहे.