हभप महेशगिरी महाराज : खटेश्वर महाराज जन्मोत्सव उत्साहात
टेंभुर्णी : संत हे प्रत्येक वेळी आपल्या भक्तांसोबत अख्ख्या जगाच्या कल्याणासाठी चिंतित असतात. आईच्या निर्भेळ प्रेमाप्रमाणे संत सर्वांवर प्रेमाचा वर्षाव करीत असतात. त्यामुळे संतांंच्या सानिध्यातच जीवनाची खरी सार्थकता सामावली आहे. असे विचार जाफराबाद तालुक्यातील गोंधनखेडा येथील संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती हभप महेशगिरी महाराज यांनी मांडले. ते रविवारी थोर संत खटकेश्वर महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त चिखली येथे आयोजित श्रीमद भागवत पुराण सांगता समारोहात कीर्तनाचे पुष्प गुंफताना बोलत होते.
पुढे बोलताना महाराज म्हणाले की, संत हे जगाच्या कल्याणासाठी आपला देह झिजवत असतात. त्यांच्या कृपादृष्टीमुळेच माणसाला भगवंताची खरी ओळख होते. एक वेळ अशीही येईल की भगवंताची प्रार्थना स्थळेही आपल्याच हाताने आपल्याला बंद करावी लागतील या गोष्टीवर कोणाचाच विश्वास बसला नसता. मात्र भगवंताने तेही करून दाखविले. कोरोनामुळे या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात भगवंताच्या घराची दारे बंद झाली होती. मात्र भगवंत खऱ्या अर्थाने दगड-मातीच्या मंदिरात नाही तर प्रत्येकाच्या ह्रदयरूपी मंदिरात वास करीत असतो. त्याला प्रेमाने एक हाक द्या, तो कधीही मदतीसाठी तयार आहे. तुम्ही त्याचे ध्यान करा तो तुमचे ध्यान ठेवील.
म्हणून प्रत्येकाने संतांच्या माध्यमातून हृदयरूपी भगवंताची ओळख करून घ्यावी असेही ते म्हणाले. संत खटकेश्वर महाराजांनी श्रीमद् भागवत कथेच्या माध्यमातून अनेक भक्तांच्या प्राणातील भक्तिमय ज्योत जागृत केली. त्यामुळे संतांचा महिमा अपरंपार आहे, असेही महाराज म्हणाले. यावेळी हभप जनार्दन पिंपळे महाराज, हभप रघुराम उखर्डे महाराज आदींची उपस्थिती होती.
फोटो
संत खटकेश्वर महाराज जन्मोत्सव सोहळ्यात कीर्तनाचे पुष्प गुंफताना हभप महेशगिरी महाराज.