जालना : शहरात मुंबई-कल्याण नावाचा मटका - जुगार चालविणाऱ्या टोळीप्रमुखासह अन्य दोघांना मुंबई पोलीस कायदा १९५१चे कलम ५५ अंतर्गत हद्दपार केल्याची कारवाई सदर बाजार पोलिसांनी केली. कमलकिशोर पुसाराम बंग (रा. कालिकुर्ती, जालना) व संजय जगन्नाथ तेली (रा. चंदनझिरा) याना एकास एक महिन्यासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले.
कमलकिशोर बंग व त्याची टोळी सातत्याने जालना शहरात गुन्हे करीत होती. सदरील व्यक्तीने दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे. त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आलेले आहे. त्याची न्यायालयानेदेखील दखल घेतली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सदर टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१चे कलम ५५ प्रमाणे प्रोसिडिंग्ज चालवून सदर टोळी हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयास पाठविलेला होता. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी टोळीप्रमुख कमलकिशोर बंग, संजय तेली यांच्यासह अन्य एकास एका महिन्यासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. गुरुवारी त्यांना बुलडाणा जिल्ह्यात नेऊन सोडण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पीएसआय राजेंद्र वाघ, पोलीस कर्मचारी समाधान तेलंग्रे, फुल्लचंद गव्हाणे, एन. यू. पठाण, धनाजी कावळे, सुधीर वाघमारे, योगेश पठाडे, स्वप्नील साटेवाड, महिला कर्मचारी पौणिमा सुलाने, सुमित्रा अंभोरे यांनी केली.