अंबड - काम करण्यासाठी कोणीतरी पुढे येत असतं. प्रत्येकाला काम करण्याची उमेद असते. त्यामुळे कायदेशीररित्या समाजहिताचे काम करणारा असेल, तर त्याला कोणीही विरोध करू शकत नाही, असे प्रतिपादन आदर्शगाव पाटोद्याचे माजी सरपंच भास्कर पेरे यांनी केले आहे.
अंबड येथे यशवंत व्याख्यानमालेच्या वतीने शनिवारपासून ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन भास्कर पेरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अंबडचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी तहसीलदार कडवकर म्हणाले की, गावात पिण्याचे शुद्ध पाणी दिले, तर गावकऱ्यांचा आरोग्याचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. सरपंचांनी आरोग्य व शिक्षण या बाबींकडे लक्ष द्यावे; तसेच शासनाच्या कृषी विभागाकडून मिळणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घेऊन काम करावे. लोकसहभागातूनच गावाचा विकास होतो, असेही ते म्हणाले. सायंकाळी पत्रकार संजय आवटे यांचे व्याख्यान झाले. प्रा. दीपक राखुंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले; तर प्रा. भागवत यांनी प्रास्ताविक केले. संजय खोरे यांनी आभार मानले. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती.
चौकट
सरपंच व ग्रामसेवकांना गावकऱ्यांनी साथ दिली तर एमआरजीएस योजना प्रभावीपणे राबून गावच्या विकासात भर टाकता येईल. पाटोदा गावाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याने या गावची सर्वत्र चर्चा झाली, तसेच संत गाडगेबाबा अभियानात प्रथम क्रमांक आल्यामुळे गाव प्रसिद्ध झाले. सरपंच म्हणून ठिकठिकाणी आपल्याला मार्गदर्शनासाठी बोलाविले जाते. पंचवीस वर्षातील कामाचा अनुभव लोकांसमोर मांडला. पिण्याचे पाणी, सांडपाणी, वृक्षलागवड, शिक्षण, स्वच्छता या बाबीवर मी लक्ष दिले. ग्रामपंचायतींना आर्थिक धोरणावर भर देणे गरजेचे असल्याचे भास्कर पेरे म्हणाले.