जालना : शहरातील रूपनगर भागातून चोरीस गेलेली जीप स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केली. या चोरी प्रकरणातील आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
शहरातील रूपनगर भागातील गजानन गिनगिने यांची जीप (क्र. एमएच २१-व्ही. १४४२) चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या जीपची चोरी दियासिंग बऱ्हयामसिंग कलाणी (रा. नवीन मोंढ्याच्या मागे, जालना) याने चोरी केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीनुसार पथकाने कारवाई करून कलाणी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी औरंगाबादेतील रेल्वे स्टेशन भागातून चोरीस गेलेली जीप ताब्यात घेतली. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोनि. सुभाष भुजंग, पोउपनि दुर्गेश राजपूत, पोहेकॉ प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, विनोद गडधे, सागर बावीस्कर, संदीप मांटे, विलास चेके, रवी जाधव यांच्या पथकाने केली.