धावडा : भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र जयदेववाडी येथे कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, शनिवारी पुन्हा ३१ रुग्णांची भर पडली आहेत. सध्या या गावात ५४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे गाव सील करण्यात आले आहे. या ठिकाणी आरोग्य विभागाची चार पथके तैनात करण्यात आली आहेत. जयदेववाडी येथे चक्रधर स्वामींचे जागृत देवस्थान आहे. महानुभाव पंथाचे मोठे धार्मिक स्थळ असल्याने येथे महाराष्ट्रासह इतर राज्यातून भक्त दर्शनासाठी येतात. येथील आश्रमात ४० जण राहतात. १५ दिवसांपूर्वीच यातील एका महंताला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर येथे असलेल्या लोकांची कोरोना तपासणी केली असता, २० महिला व ३ पुरूष असे २३ जण पॉझिटिव्ह निघाले आहे. सर्व रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर, गटविकास अधिकारी उदयसिंग राजपूत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रघुवीर चंदेल यांनी गावाला भेट दिली.
शनिवारी गावातील नागरिकांची तपासणी करण्यात आली असता, तब्बल ३१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे सांगण्यात आले. आता गावात एकूण ५४ रुग्ण आहेत. नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. चंदेल यांनी केले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल घनघाव, डॉ. आकाश वाघ, डॉ. दिपाली पवार, आरोग्य पर्यवेक्षक अशोक बर्डे, रेखा मांडेकर, डॉ. सुचिता फिरके, डॉ. महेश पिसोळे, डॉ. दीपक सोनवणे, संदीप जावळे, औषध निर्माण अधिकारी प्रफुल्ल अपार, आरोग्य सेवक धनंजय दुसान, ए. यु. दुतोंडे, आरोग्यसेविका एम.आर. लडसकर, डी. पी. मघाडे, बेबीबाई शेख हे नागरिकांच्या तपासण्या करीत आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन ग्रामसेवक प्रशांत रिंढे, उपसरपंच सुधाकर उदभर यांनी केले आहे.
===Photopath===
200221\20jan_79_20022021_15.jpg
===Caption===
जयदेववाडी येथे जिल्हाआरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी भेट दिली.