अंबड (जि. जालना) : नैसर्गिक अनुदान वाटपात घोटाळा झाल्याचे तीन महिन्यांपूर्वी उघड झाले होते. याप्रकरणी २२ तलाठ्यांसह २८ जणांवर मंगळवारी रात्री उशिरा अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. २४ कोटी ९० लाख ७७ हजार ८११ रुपयांची अफरातफर केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. या प्रकरणात २२ तलाठ्यांना यापूर्वीच निलंबित करून त्यांची विभागीय चौकशीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे. अंबड आणि घनसांवगी येथील तत्कालीन दोन तहसीलदारांची विभागीय चाैकशी सुरू करण्यात आलेली आहे. मात्र, अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हे दाखल झालेले नाहीत. घोटाळ्याचा आरोप असलेले महसूल सहायक नीलेश सुखानंद इंचेकर हे मयत झालेले आहेत.
२०२२ ते २०२४ या काळात अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळी अनुदान शासनाकडून देण्यात आले होते. तत्कालीन सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देण्यात आली होती. मात्र, अनुदान वाटप करताना बोगस लाभार्थ्यांचे बनावट दस्तऐवज तयार करण्यात आले. तसेच संगणक प्रणालीचा गैरवापर करून अनुदानाच्या निधीमध्ये अपहार केल्याचा आरोप पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीत करण्यात आलेला आहे. घोटाळ्यातील आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. यानंतर प्रशासनाने अंबड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अंबड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले सहायक महसूल अधिकारी विलास मल्हारी कोमटवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४५३ /२०२५ अन्वये गुन्हा करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अमोल गुरले करत आहेत.
या आरोपींचा समावेशआरोपींमध्ये तलाठी गणेश रुषिंदर मिसाळ, कैलास शिवाजीराव घारे, विठ्ठल प्रल्हादराव गाडेकर, बाळू लिंबाजी सानप, पवनसिंग हिरालाल सुलाने, शिवाजी श्रीधर ढालके, कल्याणसिंग अमरसिंग बमनावत, सुनील रामकृष्ण सोरमारे, मोहित दत्तात्रय गोषिक, चंद्रकांत तुकाराम खिल्लारे, रामेश्वर नाना जाधव, डिगंबर गंगाराम कुरेवाड, किरण रवींद्रकुमार जाधव, रमेश लक्ष्मण कांबळे, सुकन्या श्रीकृष्ण गवते, कृष्णा दत्ता मुलगुले, विजय हनुमंत जोगदंड, निवास बाबुसिंग जाधव, विनोद जयराम ठाकरे, प्रवीण भाऊसाहेब शिनगारे, बप्पासाहेब रखमाजी भुसारे, सुरज गोरख बिक्कड यांच्यासह सहायक महसूल अधिकारी सुशील दिनकर जाधव, नेटवर्क इंजिनिअर वैभव विशंभरराव आडगांवकर, तत्कालीन संगणक परिचालक विजय निवृत्ती भांडवले, महसूल सेवक रामेश्वर गणेश बारहाते, महसूल सहायक आशिषकुमार प्रमोदकुमार पैठणकर, महसूल सहायक दिनेश बेराड यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.