जालना : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी वृक्ष लागवड योजनेसाठी जालना जिल्ह्यामध्ये जोरदार तयारी करण्यात येत आहे. या योजनेतील वृक्ष लागवडीसाठी खड्डे घेण्यासह अन्य कामेही पूर्ण होत आली आहेत. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वन विभाग कामाला लागला आहे. जालना जिल्ह्यात २० हेक्टर वनक्षेत्र परिसरात १६ हजार झाडांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्यावतीने देण्यात आली आहे.वाढती लोकसंख्या, उद्योग, शेतीचा विस्तार, सिंचन व इतर प्रकल्प यामुळे मागील काही वर्षात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी वृक्षांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. जंगल तोडीमुळे जगाला तापमानातील वाढ, हवामानात बदल व ऋतू बदलाचे परिणाम आताच दिसायला लागले आहेत. हे सर्व दृष्परिणाम टाळण्यासाठी राज्य शासनाने २०१७ ते २०१९ या कालावधीत ५० कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मागील वर्षी १३ कोटी वृक्षांची लागवड करण्यात आली. यावर्षी ३३ कोटी वृक्षांची राज्यभरात लागवड होणार आहे.या पावसाळ्यात जिल्ह्यात वन विभागामार्फत १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान शहराजवळील २० हेक्टर क्षेत्रावर १६ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यासाठी ८०० खड्डे करण्याचे काम सुरु आहे. शहरातील नर्सरीमधून ही रोपे आणण्यात येणार असल्याची माहिती वनपरिमंडळ अधिकारी एस. एन. गुरकुले यांनी दिली. दरम्यान, दरवर्षी वन विभागाकडून वृक्षांची लागवड करण्यात येते. परंतु, या वृक्षांना उन्हाळ््यात पाणी देण्यात येत नसल्याने ती पुन्हा करपून जातात. याकडे कोणाचेच लक्ष नसते. झाडे लावली जातात त्यांना जगविणे महत्वाचे आहे. याकडे संबधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
जालना जिल्ह्यात यावर्षी १६ हजार झाडांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 00:08 IST