जालना : खरिपाचा हंगाम आता जवळ येत असून, शेतकऱ्यांनी शेती मशागतीसह खते, बी-बियाणांची जुळवाजुळव सुरू केली आहे. परंतु, खताचे दर वाढल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णत: कोलमडून जात आहे.
सततच्या स्मानी-सुल्तानी संकटांमुळे जिल्ह्यातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे. गत खरीप हंगामातील अतिवृष्टी, रब्बीतील अवकाळीसह रोगराईमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. लॉकडाऊनमध्ये उत्पादित मालही विक्री करणे मुश्किल झाले आहे. त्यात आता आगामी खरीप हंगामाची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. बाजारात खतासह बी-बियाणांचे दर वाढले आहेत. वाढलेले दर पाहून शेतकरी अवाक होत आहेत. त्यात शेती मशागतीसाठी लागणाऱ्या यंत्राचे दरही संबंधितांनी वाढविले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक जुळवाजुळव करावी लागत आहे.
शेतीच्या मशागतीचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले
पूर्वी शेती मशागतीची बहुतांश कामे बैलांचा वापर करून केली जात होती. एकत्रित कुटुंब असल्याने आणि बहुतांशजण शेतात काम करीत असल्याने शेती कामाचा खर्च हा कमी होता. परंतु, आधुनिकीकरणामुळे आता शेती मशागतीची कामे ही यंत्राद्वारे केली जात आहेत. त्यात आता इंधन दरवाढ मोठ्या प्रमाणात झाल्याने नांगरणी, पेरणी, मोगडणीसह इतर कामांच्या दरातही संबंधित यंत्र चालकांनी वाढ केली आहे. मशागतीचे वाढलेले दर, खताचे वाढलेले दर, बी-बियाणांचीही अशीच अवस्था ! त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडत असून, शासनाने खते, बी-बियाणांचे दर नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे.
इंधन दरवाढीचा परिणाम
शेतातील बहुतांश कामे आता यंत्राद्वारे केली जातात. त्यात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यात मशागतीचे दर वाढत असल्याने आर्थिक फटकाही बसत आहे.
खताच्या किमतीत वाढ झाल्याने पिकांना खत टाकणे मुश्किल झाले आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत खताच्या किमती अधिक झाल्या आहेत. ऊसासारख्या पिकाला तर मोठ्या प्रमाणात खत द्यावे लागते.
- दिलीप मते, वडीकाळ्या
शासन खताचे भाव वाढवून शेतकऱ्यांना वेठीस धरत आहे. शेतकरी अस्मानी- सुल्तानी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांची होणारी फरफट पाहता शासनाने खताचे दर नियंत्रित करून ते कमी करण्याची गरज आहे.
- विजय उढाण, मुरमा
शेतकरी सतत अस्मानी संकटांचा सामना करीत आहे. शासकीय योजनांपासूनही अनेक शेतकरी वंचित राहतात. त्यात आता खताचे दरही वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
- अरूण कळकटे, भणंग जळगाव
डीएसपीचे दर आधीचे दर आताचे दर
१०-२६-२६ ११३० ११७५
१९-१९-१९ १२७५ १२७५
१२-३२-१६ ११५० ११८५
१८-४६-० १२५० १३२५