देऊळगावराजा : काही दिवस ब्रेक लागलेल्या काेरोनाची रूग्णसंख्या पुन्हा वाढू लागली असून, आरोग्य विभागाने दक्षतेसाठी आवश्यक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. आजवर तालुक्यात १४६५ रूग्ण आढळून आले आहेत. दुसरीकडे रूग्णसंख्या वाढत असताना पालिका, पोलीस प्रशासनात समन्वयाचा अभाव असल्याने सुरक्षित अंतराचे तीन तेरा झाले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात गत आठवड्यापासून कोरोनाची रूग्णसंख्या झपाट्याने वाढली आहे. ही बाब लक्षात घेवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने उपाययोजनांबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. देऊळगाव राजा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यासाठी आवश्यक त्याउपाय योजना तहसीलदार, डॉ. सारिका भगत तसेच ग्रामीण रुग्णालयातील डॉ. आसमा शाईन यांनी प्रत्यक्षात राबिवण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना नगर परिषदेचा नियोजन शून्य कारभार दिसून येत आहे. पोलीस प्रशासन व पालिकेत समन्वयाचा अभाव असल्याने शहरात सुरक्षित अंतराच्या नियमाचा फज्जा उडाला आहे. तसेच मास्कचा वापरही अनेकजण करीत नाहीत. विविध कार्यक्रमही थाटामाटात पार पडत आहेत. याकडे नगर परिषद, पोलीस विभाग दुर्लक्ष करत आहे. आजवर ग्रामीण रुग्णालयात आरटीपीसीआरच्या ८०९२ तर रॅपिडच्या ३८७४ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात एकूण १४६५ रुग्ण आढळून आले आहेत. रूग्णालयातील उपचारानंतर १०३८ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.