वडीगोद्री : अंबड तालुक्यात दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढत असून, वातावरणात बदल होत असल्याने सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. बहुतांश घरांमध्ये या आजाराचे रूग्ण आहेत. विशेष म्हणजे सर्दी, खोकला, ताप आदी कोरोनाची लक्षणे आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव पुन्हा होतो की काय ? अशी चिंता नागरिकांना सतावत आहे.
तालुक्यात आधीच्या पावसाळी वातावरणानंतर काही दिवसांपासून थंडीचा जोर कमी-जास्त होत असून वातावरणात मोठ्या प्रमाणात गारव्यासह उष्णताही निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपूर्वी परिसरातील थंडी अचानक गायब झाली होती व वातावरण गरम व ऊबदार बनले होते. त्यानंतरच्या काळात थंडीने अचानक जोर घेतल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. घराघरांमध्ये सर्दी, खोकला व इतर ताप सदृश्य आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. हे रुग्ण गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. शिवाय ग्रामीण भागात टायफॉईड, मलेरिया सदृश्य आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग अटोक्यात आला आहे. परंतु, थंडीच्या काळात नागरिकांनी काळजी न घेतल्यास कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. अनेकजण विनामास्क बाहेर फिरत आहेत. कोरोनाचा फैलाव पाहता नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे.
नागरिकांनी दक्षता घ्यावी
थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. सर्दी, खोकला, ताप आदी आजार झाले तर कोरोना झाला असे नाही. त्यामुळे तज्ज्ञांमार्फत योग्य औषधोपचार घेणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सूचनांचे पालनही सर्वांनी करणे महत्त्वाचे आहे.
डॉ. सुशील जावळे
प्राथमिक आरोग्य केंद्र, वडीगोद्री