बाळासाहेब गवले
माहोरा : जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी जवळपास १५ वर्गखोल्या कमी पडत आहेत. वर्गखोल्या नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे शाळेतील सर्व वर्ग पूर्ववत सुरू होण्यापूर्वी या वर्गखोल्यांची कामे करावीत, अशी मागणी होत आहे.
माहोरा येथे जिल्हा परिषदेची पहिली ते दहवीपर्यंत शाळा आहे. या शाळेत जवळपास एक हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एक हजारांवर विद्यार्थ्यांसाठी या शाळेत असलेल्या वर्गखोल्या कमी पडत आहेत. शाळेत दहावीच्या चार तुकड्या, नववीच्या चार तुकड्या, आठवीच्या चार तुकड्या, सातवीच्या तीन तुकड्या, सहावीच्या तीन तुकड्या, पाचवीच्या तीन तुकड्या अशा एकूण २१ तुकड्या आहेत. त्यामुळे या शाळेसाठी वाढीव १६ वर्गखोल्यांची गरज आहे. अपुऱ्या वर्गखोल्यांमुळे शाळा नियमित सुरू असताना विद्यार्थ्यांची गैरसोय होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, नववी व दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे इतर वर्गही लवकरच सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्गखोल्या कमी असल्याने विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तातडीने नवीन वर्गखोल्यांना मंजुरी देऊन बांधकाम करावे, अशी मागणी ग्रामस्थ, पालक करीत आहेत. दरम्यान, या शाळेतील मुख्याध्यापक पदासह एक सुपरवायझर, माध्यमिकचे गणिताचे शिक्षक, पदवीधरचे पाच शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही रिक्तपदेही तातडीने भरण्याची गरज आहे.
शिक्षण विभागाकडे पाठपुरावा
शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांची प्रत्यक्षात भेट देऊन शाळेतील समस्या मांडल्या आहेत. या समस्या सोडविण्याबाबत चर्चाही करण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या पाहता या शाळेतील वर्गखोल्यांचा प्रश्न तातडीने सोडवावा.
संतोश वरपे
अध्यक्ष, शालेय समिती
वर्गखोल्यांच्या समस्येसह रिक्तपदांबाबत वरिष्ठांना अहवाल दिला आहे. शालेय समितीसह ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा पाठपुरावाही याबाबत सुरू आहे. आम्ही वरिष्ठांकडे पाठपुरावा करीत असून, लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.
श्रीकृष्ण चेके
प्रभारी मुख्याध्यापक, माहोरा
ग्रामस्थांचे निवेदन
शाळेतील विविध समस्या सोडविण्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी निमा अरोरा, शिक्षणाधिकारी कैलास दातखिळ यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. शिवाय सरपंच वैशाली कासोद, उपसरपंच गजानन साळोक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गव्हाले, शालेय समिती अध्यक्ष संतोष वरपे, उपाध्यक्ष सुखदेव खरसान, संतोष गौरकर, आदी पदाधिकारीही शाळेचा प्रश्न सोडविण्यासाठी पठपुरावा करीत आहेत.