टेंभुर्णी : पुरातन काळी लग्नाचा मांडव टाकला की, लग्नाच्या दिवशी पहाटेच त्यात एका बाजूला बहुले बनविले जायचे. गावामध्ये हुबेहूब बहुले बनविण्यासाठी काही व्यक्ती प्रसिद्ध असायच्या. ज्याच्या घरी लग्नकार्य असायचे, तो खासकरून बहुले बनविणाऱ्यांना अगोदरच निमंत्रण देऊन ठेवायचे. काळाच्या ओघात आता झटपट विवाहाच्या क्रेझमध्ये लग्नातील अनेक विधींना आहोटी लागली आहे. त्यात अनेक लग्नमंडपातून बहुलेही हद्दपार झाले असले, तरी ग्रामीण भागात आजही काही समाज बांधवांनी बहुल्याचे महत्त्व टिकवून आहे.
आज गावोगावी बहुले बनविण्यात निष्णात असलेले जुने हाथ थकले असले, तरी अनेक गावांतून नवीन पिढीने हा वारसा पुढे चालविला आहे. अनेक जण आजही आकर्षकरीत्या बहुल्याला सजवितात. बाहुल्याचे दात बनविण्यासाठी मात्र आज करडीच्या दाण्यांचा शोध घ्यावा लागतो, तर डोळे कवड्यांनी सजविले जातात. लग्नमंडपात आकर्षक बहुला दिसला की, वऱ्हाडी मंडळींसह पाहुण्या-राऊळ्यांचे लक्ष त्याकडे सहज वेधले जाते.
चौकट
आमच्या धनगर गल्लीतच नव्हे, तर गावात कुठेही लग्न असले, तर मला बहुले बनविण्यासाठी हमखास बोलाविले जायचे. कुठलेही मानपान न लागू देता, मी मोठ्या आनंदाने ते कार्य पार पाडायचो. लग्नघरातील अन्य माणसे हाताखाली असायची. बहुल्याचा चेहरा सजविण्याचे विशेष कौशल्य गावात ठरावीक लोकांकडेच असायचे. आज काळाच्या ओघात अनेक मंडपात बहुले दिसत नसले, तरी ठरावीक समाजात बहुल्यांचे महत्त्व कायम आहे. हात थरथरायला लागल्याने, आता फक्त नवीन युवकांना मार्गदर्शन करतो.
रामकीसन सोरमारे, जुने बहुले कारागीर, टेंभुर्णी.
चौकट
मंडपातील बहुले हे मांगल्याचे प्रतीक आहे. वधू-वर जणू बहुल्याला साक्षी ठेवूनच कन्यादानासह सर्व धार्मिक विधी पार पाडतात. बहुल्याच्या डोक्यावर एक दिवा ठेवला जातो. तो नवदाम्पत्याच्या जीवनात कुलदीप बनून वंशाचा दिवा तेवत राहो, या अर्थाचे प्रतीक असतो.
विठू माउली महाराज, पुरोहित, टेंभुर्णी
===Photopath===
200221\20jan_33_20022021_15.jpg
===Caption===
टेंभुर्णी येथे नुकत्याच पार पडलेल्या एका लग्न समारंभात विवाह मंडपात बाहुले सजविताना युवा पिढीतील दत्तू कुमकर, विलास कुमकर आदी.