शिवसंग्राम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी । जालना
मुंबई येथे १९ सप्टेंबरला झालेल्या शिवसंग्राम-इतर मराठा संघटना आणि प्रमुख समन्वय यांच्यात उपस्थितीत झालेल्या राज्यव्यापी बैठकीतील मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी शिवसंग्राम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मराठा समाजाचे आरक्षण ५ मे २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. त्यानंतर केंद्र सरकारने संसदेच्या अधिवेशनामध्ये १०२ व्या घटना दुरुस्ती करून १२७ वी घटना दुरूस्ती केली आणि राज्यांना आरक्षण देण्याचे व मागास ठरविण्याचे अधिकार दिले आहेत. यासारखे निर्णय होत असताना राज्य सरकार मात्र कोणतेही पाऊल उचलताना दिसत नाही. मराठा आरक्षण रद्द होण्यासासारखा एवढा मोठा निर्णय झाला. ज्या मराठा समाजावर मोठा परिणाम होत आहे. पण राज्य सरकार मात्र कुठलीच ठाम भूमिका घेत नाही. म्हणून राज्यात मराठा समाजामध्ये प्रचंड नाराजी व चीड निर्माण झाली आहे. ती राज्यव्यापी बैठकीतसुद्धा दिसून आली. त्याच अनुषंगाने राज्यव्यापी बैठक घेऊन ठराव पास करण्यात आले आहे. कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील महापुरामध्ये ज्यांचा बळी गेला त्यांच्याबद्दल शोकप्रस्ताव पास करून दु:ख व्यक्त केले. केंद्र सरकारने राज्याच्या हिताचा विचार करून १२७ वी घटना दुरुस्ती करून मागास ठरविण्याचा अधिकार राज्य सरकारना दिला. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे अभिनंदन करणारा ठराव पास करण्यात आला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सारथीसाठी पुणे येथे जमीन मिळवून दिली. त्याबद्दल अभिनंदनाचा ठराव पास केला गेला. मराठा समाजाच्या मुला-मुलींची ईएसबीसी आणि इतर विभागांच्या पदभरतीची सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. त्या सर्वांना नियुक्त्या द्याव्यात. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबईतील अरबी समुद्रातील स्मारकाचे काम लवकर सुरू करण्यासाठी त्या बाधा येणाऱ्या कायदेशीर अडचणी दूर करून काम लवकर सुरू करा, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला ५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्या, मराठा समाजाच्या मुला-मुलींना उद्योग, व्यवसायासाठी भागभांडवल द्या, आरक्षणासाठी ज्या तरुणांनी बलिदान दिले, त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व नोकरी द्यावी, पंजाबराव देशमुख वसतिगृह सर्व जिल्ह्यामध्ये सुरू करावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर युवक जिल्हाध्यक्ष नीलेश गोर्डे, जिल्हा उपाध्यक्ष नारायण टकले, तालुकाध्यक्ष सचिन खरात, भारत राजबिंडे,राजेश शेळके,नवनाथ राजबिंडे,सुखदेव राजबिंडे,बळिराम शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते.