भोकरदन ते आन्वा मार्गे अजिंठा व भिवपूर ते आव्हाना येथून केळणा नदीवरुन ते सिल्लोड किंवा वाकडी, आन्वा मार्गे अजिंठा- शिवणा या मार्गावर वाहू माफीयांची अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. भोकरदन तालुक्यातून वाळूचे वाहन निघते. ते वाकडी मार्गे आन्वात ते अजिंठा परिसरात जाते. या मार्गावर चार पोलीस ठाण्यांची हद्द आहे. भोकरदन महसूल, भोकरदन, पारध, अजिंठा, हसनाबाद ही चार पोलीस ठाणे येतात. तरीही अवैध वाळू उपसा, वाहतूक सुरू आहे. वाळूची वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांवर नंबर प्लेटही नसतात तर काही वाहनांच्या नंबर प्लेटला रंग लावलेला दिसून येतो. हा प्रकार सर्वसामान्यांना दिसत असला तरी महसूल, पोलीस प्रशासनाला दिसत नसेल का असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेषत: भरधाव वेगात जाणाऱ्या या वाळू वाहतूक वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देवून अवैध वाळू उपसा, वाहतूक थांबवावी, अशी मागणी होत आहे.
आन्वा- भोकरदन मार्गावर अवैध वाळू वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:37 IST