जालना : जिल्ह्यातील एक लाख २९ हजार ४४८ कृषी पंपधारकांकडे महावितरणची १,७८९ कोटी ६५ लाख रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीदारांसाठी महावितरणकडून महा-कृषी ऊर्जा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे एकूण ७७४ कोटी ७३ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. उर्वरित १,०१४ कोटींच्या मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास उर्वरित ५० टक्के म्हणजे एकूण ५०७ कोटींची रक्कम माफ करण्यात येणार आहे.
कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या, तसेच वीज बिलांच्या वसुलीसाठी थकबाकी, व्याज व विलंब आकारात सवलत देणारे महा-कृषी ऊर्जा अभियान ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून जाहीर झाले आहे. या धोरणानुसार थकबाकीसह चालू वीज बिलांद्वारे वसूल झालेल्या एकूण रकमेपैकी ३३ टक्के रक्कम ग्रामपंचायत क्षेत्रात, तर ३३ टक्के रक्कम जिल्हास्तरीय क्षेत्रात नवीन उपकेंद्र, वाहिन्यांसह विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरण, तसेच विस्तारीकरणासाठी वापरण्यात येणार आहे.
महा-कृषी ऊर्जा अभियानात सर्व उच्च व लघुदाब कृषिपंप ग्राहक, तसेच उपसा जलसिंचन योजनेतील चालू व कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्राहकांच्या ५ वर्षांपूर्वीच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात आला आहे, तसेच ५ वर्षांपर्यंतच्या थकबाकीवरील विलंब आकार १०० टक्के माफ करून व्याज हे १८ टक्क्यांऐवजी त्या-त्या वर्षाच्या खेळत्या भांडवलावरील व्याजदरानुसार आकारण्यात येत आहे.
या अभियानानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार सर्व एक लाख २९ हजार ४४८ कृषिपंप ग्राहकांनी त्यांच्या मूळ थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ करण्यात येणार आहे. म्हणजेच येत्या वर्षभरात कृषी ग्राहकांनी मूळ थकबाकीच्या ५०७ कोटी रुपयांचा भरणा केल्यास उर्वरित थकबाकीची तेवढीच रक्कम माफ करण्यात येणार आहे. ज्या ग्राहकांनी या अभियानात एक ते तीन वर्षांसाठी सहभाग घेतला त्यांनी त्या-त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रकमेपैकी पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के आणि तिसऱ्या वर्षी २० टक्के माफ करण्यात येणार असून, मूळ थकबाकीचा भरणा करताना चालू वीज बिलांची रक्कम भरणेही गरजेचे आहे.
गावागावांत जनजागृती
महा-कृषी ऊर्जा अभियानाबाबत सध्या महावितरणकडून गावागावांत जनजागृती केली जात आहे. कृषिपंपधारकांसाठी ही योजना महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी केले आहे.