जालना : ज्येष्ठ नागरिकांसह विविध आजार असलेल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जात आहे. विविध आजार असलेले अनेक नागरिक लसीकरणाबाबत संभ्रम व्यक्त करीत आहेत. या नागरिकांनी संभ्रमावस्था न बाळगता लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केले आहे.
जालना जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १९ हजार ६८५ वर गेली असून, त्यातील ४१९ जणांचा मृत्यू झाला आहे, तर आजवर १७ हजार ८५१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. प्रारंभी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्यात आली. त्यानंतर विविध आजार असलेल्या आणि ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. परंतु, विविध आजार असलेल्या नागरिकांमध्ये लसीबाबत संभ्रमावस्था आहे. ही संभ्रमावस्था दूर करण्याचे प्रयत्न आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी करीत आहेत. अधिकाधिक नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेळेत पूर्ण व्हावे, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाविरुध्दच्या लढ्यात सर्वांनी लस घेणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
काय म्हणतात तज्ज्ञ....
जिल्हा रुग्णालयाच्या वतीने लसीकरणाबाबत वेळोवेळी जनजागृती केली जात आहे. लसीकरण करताना आवश्यक त्या बाबींची तपासणी केली जात आहे. नागरिकांनी मनात कोणीतीही भीती न बाळगता लस घ्यावी.
- डॉ. पद्मजा सराफ
फिजिशियन
ज्यांना रक्तदाबाचा, उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेल्या आहेत, ज्यांचे वय अधिक आहे, अशा नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे. लसीबाबत मनात कोणतीही शंका घेऊ नये.
- डॉ. आशिष राठोड
हृदयरोगतज्ज्ञ
किडनीचे आजार, कॅन्सर, उच्च रक्तदाबासह इतर आजार असलेल्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असते. त्यामुळे असा आजार असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे.
- डॉ. प्रशांत बांदल
किडनी विकारतज्ज्ञ
मधुमेहाचा त्रास असलेल्या नागरिकांनीही कोरोना प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे. गंभीर आजार असलेल्या व्यक्तींची प्रकृती कोरोनामुळे अधिक खालावत आहे. त्यामुळे मधुमेह बाधित नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी.
- डॉ. राजेश सेठिया
मधुमेहतज्ज्ञ
थंडी-ताप आला तरी घाबरू नये...
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर काही नागरिकांना ताप येणे, थंडी वाजण्याचा त्रास होऊ शकतो. असा त्रास झाला तर घ्यावयाची औषधे लसीकरणानंतर दिली जात आहेत. ती औषधे घेतल्यानंतर होणारा त्रास कमी होतो. परंतु, केवळ ताप, थंडीच्या भीतीने लसीकरणाकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये. लसीकरणाचा काहीच नागरिकांना त्रास होत असून, न घाबरता सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.
३९१९६ जणांना आतापर्यंत दिली लस
१४१२५ इतक्या ज्येष्ठ नागरिकांना दिली लस