जालना : ‘रक्तदान हेच जीवदान, जे वाचवते दुसऱ्याचे प्राण’ या उक्तीप्रमाणे आयकॉन स्टीलच्या जवळपास बहुतांश कर्मचाऱ्यांसह महिलांनी रक्तदान करत आपले सामाजिक दायित्व पार पाडले. ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमांतर्गत जालना एमआयडीसीतील आयकॉन स्टील कंपनीत रक्तदान शिबीर घेण्यात आले. या उपक्रमाला कंपनीतील कामगार, सुरक्षारक्षक, कर्मचारी यांच्याकडून भरघोस प्रतिसाद मिळाला.
लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर रक्ताचं नातं याअंतर्गत महारक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जालना आयकॉन स्टील उद्योग समूहामध्ये गुरुवारी रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी कंपनी व्यवस्थापनातील अधिकारी, कर्मचारी, कामगार आदींची उपस्थिती होती. कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या स्वयंस्फूर्तीने कर्मचारी, कामगार यांनी रक्तदान करून या महायज्ञात खारीचा वाटा उचलला. यावेळी उपस्थित रक्तदात्यांचे कंपनी व्यवस्थापनाकडून स्वागत करण्यात आले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी कंपनी व्यवस्थापनासह जनकल्याण रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी शिवराज जाधव यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला कंपनी व्यवस्थापनाकडून विशेष किट, तसेच जनकल्याण रक्तपेढी व लोकमत समूहाकडून प्रमाणपत्र देण्यात आले.
चौकट...
काही रक्तदात्यांनी याआधी ३० पेक्षा जास्त वेळा रक्तदान करून अनेकांचे प्राण वाचविले आहेत. कोरोना काळातही त्यांनी रक्तदानासारखे अमूल्य कार्य पार पाडत अनेकांना जीवनदान दिले आहे. यापुढेही आम्ही रक्तदान करू, असा मानस त्यांच्या वतीने यावेळी व्यक्त करण्यात आला.
----------------------------------------------------------------------------
००००००००००००००००००००००००००००
पारध येथील शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध येथे लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी ‘लोकमत रक्ताचं नात’अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन पोलीस उपविभागीय इंदलसिंग बहुरे यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे बहुरे यांनी स्वत: रक्तदान करून या शिबिराचा श्रीगणेशा केला. हे शिबिर लोकमत आणि माजी सभापती मनीष श्रीवास्तव यांच्या कॉम्प्लेक्समध्ये राजर्षी शाहू कॉलेज यांच्या सौजन्याने घेण्यात आले. यावेळी पारध ठाण्याचे सपोनि अभिजित मोरे, हभप विष्णू महाराज सास्ते, सरपंच दिनेश सुरडकर, वैद्यकीय अधिकारी अशोक वाघमारे, तंटामुक्ती अध्यक्ष कैलास बडनेरे, प्राचार्य राजाराम डोईफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे उद्घाटन पार पडले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रमेश जाधव, बंटी बेराड, पांडू लोखंडे, सागर श्रीवास्तव, धनंजय मोकाशे, हरिदास गवळी, गणेश मूठ्ठे, राजू आंबेकर, संतोष मोकाशे, प्रा. राजू शिंदे, प्रा. राजबिंडे, काशीनाथ लोखंडे आदींनी परिश्रम घेतले.
--------------------------------------------------------