- पवन पवार वडीगोद्री (जालना): सरकार उलथून टाकायला जरांगेंकडे किती आमदार? असा सवाल करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे हे उपोषणवीर नाही, तर सलाईन लावून उपोषण करणारे 'सलाईन वीर' आहेत अशी टीका केली. तसेच वाळू तस्करांच्या चांडाळ चौकडीतच मनोज जरांगे बसलेले असल्याचा आरोप हाके यांनी केला. वडीगोद्री येथे हाके यांनी माध्यमांशी संवाद साधला.
हाके पुढे म्हणाले, अजित पवारांचे आमदार मुख्यमंत्र्यांना शिव्या देणाऱ्याच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतात. त्यांनी राजीनामा देऊन आंदोलनात सहभागी व्हावे, असे आव्हान हाके यांनी विजयसिंह पंडित आणि प्रकाश सोळंके यांना दिले. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेचे स्वागत करत हाके यांनी शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतला मराठा एकच आहे असेही सांगितले.
सरकारकडून दुजाभावगुन्हा दाखल होताच आम्हाला लगेच अटक केली जाते, अशी तत्परता जरांगेंच्या बाबतीत दाखवा. दोन वर्षांपासून जरांगे महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेत, हजारो कर्मचाऱ्यांचा गृह विभाग असूनही राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यास एकदाही अटक केली नाही. सरकार दुजाभाव करत असल्याचा आरोप हाके यांनी केला.
ओबीसी वोटबँक जागी झाली तर...सरकार 14 ते 15 टक्के लोकांच्या मताला एवढे घाबरत असेल तर आमची तर 50 ते 60 टक्के मतांची वोट बँक आहे. झोपलेल्या ओबोसींना जागे करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ओबीसी आरक्षणा रक्षणासाठी जीव गेला तरी चालेल. ज्यादिवशी ओबीसी वोट बँक जागी होईल, त्यादिवशी यांना एखाद्या गावचा सरपंच सुद्धा आम्ही होऊ देणार नाही, असेही हाके म्हणाले.