आंदोलनाचा नववा दिवस; शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रॅली
महाकाळा (अंकुशनगर) : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी २० जानेवारीपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा गुरुवारी नववा दिवस होता. त्यात मागील तीन दिवसांपासून अन्नत्याग केलेल्या चौघांची प्रकृती खालावली असल्याचे खासगी डॉक्टरांनी सांगितले.
यात शिवबा संघटनेचे मनोज जरांगे, बाबासाहेब वैद्य, मुक्ताबाई ढेपे (वय ६५), संतोष ढवळे यांची प्रकृती खालावली आहे. मागील काही वर्षांपासून मराठा समाजातील नागरिकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने केली आहेत. असे असतानाही शासनाकडून दखल घेतली जात नाही. शासनाने मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे, यासाठी अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथील ग्रामस्थांनी २० जानेवारीपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. गुरुवारी या आंदोलनाचा नववा दिवस होता. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या डॉक्टरकडून तपासणी केली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गुरुवारी परिसरातील सात गावांतून दुचाकी रॅली काढण्यात आली होती.