देळेगव्हाण : आज सगळीकडे गुणवत्ता व ज्ञानाला महत्त्वाचे स्थान आहे. एक -एक गुण मिळवण्यासाठी अतिशय स्पर्धा सुरू आहे. या युगात स्पर्धेत टिकायचे असेल तर कठोर परिश्रम करण्याची तयारी, जिद्द आणि चिकाटी असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रकाश कापसे यांनी केले.
गेल्या सहा वर्षांपासून प्रकाश कापसे यांच्याकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व चषक देऊन सत्कार केला जातो. यंदा देळेगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेतील अजिनाथ जाधव, ऋतुजा रेवगडे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना कापसे म्हणाले की, जिल्हा परिषद शाळेचे सर्वच विद्यार्थी गुणवंत व प्रामाणिक असून, आज्ञाधारक आहेत. शाळेला उत्कृष्ट शिक्षक लाभल्याने क्रीडा क्षेत्रात या चिमुकल्यांनी विभागीय स्तरावर शाळेचे व गावाचे नाव झळकावले आहे. या चिमुकल्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांची जिज्ञासूवृत्ती पहावयास मिळाली, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दत्तू पंडित, भगवान बनकर, रामकिसन कापसे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष तुळशीराम गाढवे यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थांची उपस्थिती होती.