जालना जिल्ह्यातील ४७५ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात संपली होती. त्यापैकी १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या असून, आता ४५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहे. ८ हजार १५७ उमेदवार रिंगणात उरतले असून, या उमेदवारांचीही प्रशासनाकडून कोरोना चाचणी करण्यात आलेली नाही. राज्यात सध्या नव्या कोरोनाचे ८ ते ९ रूग्ण सापडले आहेत. अशा परिस्थितीत खबरदारी घेण्याची गरज आहे. मात्र, असे असताना प्रशासनाकडून उमेदवार, अधिकारी व कर्मचारी यांच्या तपासणीला फाटा देण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय काळजी घेतली
मतदान करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीची सुरूवातीला कोरोना तपासणी केली जाणार आहे. ज्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे दिसतील, त्याला रूग्णवाहिकेद्वारे कोविड सेंटरला नेले जाईल. मतदानासाठी येणाऱ्या व्यक्तीचे तापमानदेखील तपासण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, असे असले तरी ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवडणुकीच्या कामासाठी निवड करण्यात आली आहे, त्यांच्या कोरोना चाचणीकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे.
जिल्ह्यात १३७ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची निवड
जिल्ह्यात १५ जानेवारी रोजी ४५७ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. ही निवडणूक शांततेत व सुरळीत पार पडावी, यासाठी शासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड केली आहे. एकूण १३७ क्षेत्रीय अधिकारी व ११३ निवडणूक अधिकाऱ्यांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.