देवगाव खवणे येथे विद्यार्थ्यांचा सत्कार
मंठा : तालुक्यातील देवगाव खवणे येथील ओंकारेश्वर संस्थान आश्रमात नुकताच गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास महंत बालकगिरी महाराज, रणजित बोराडे, गणेश महाराज डोंगरे, मृदंगविशारद नामदेव महाराज शास्त्री, बळीराम महाराज बोडखे, दिनेश कुलकर्णी, सुरेश वैद्य यांच्यासह विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन आचारसंहिता
जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. त्यासाठी शासनाने विशेष आचारसंहिता जारी केली आहे. सुरक्षित अंतर ठेवून प्रजासत्ताक दिन कार्यक्रम घ्यावा. कार्यालयांवर विद्युत रोषणाई करावी, शाळा, महाविद्यालयीन स्तरावर ऑनलाईन स्पर्धा घ्याव्यात आदी सूचना करण्यात आल्या आहेत.
पोषण आहार माहिती भरण्याचे आवाहन
जालना : जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापन व माध्यमांच्या अनुदानित शाळांनी शालेय पोषण आहारविषयक माहिती तत्काळ ऑनलाईन पध्दतीने भरावी, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. शालेय पोषण आहारास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची शाळेतील ३० सप्टेंबर २०२० पर्यंतची पटसंख्या आवश्यक असल्याचेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
विस्कळीत सेवा सुरळीत करण्याची मागणी
जाफराबाद : शहरासह ग्रामीण भागातील बीएसएनएलची सेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. एकमेकांशी संपर्क साधताना अडचणी येत असून, इंटरनेट सेवेचाही फज्जा उडाला आहे. याकडे बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सेवा सुरळीत करावी, अशी मागणी ग्राहकवर्गातून केली जात आहे.