मंठा : पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका इसमास फाटकी नोट परत दिल्याने २५ जणांनी चार कर्मचाऱ्यांना लोखंडी रॉडने मारहाण करून जबरदस्तीने १ लाख ५ हजार रुपये नेल्याची घटना मंठा शहराजवळील गोविंद गंगा पेट्रोल पंपावर बुधवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी संशयित आरोपी सलमान रहमत गुलखान पठाण व सनी म्हस्के यांच्यासह २५ जणांवर मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सलमान रहमत गुलखान पठाण व सनी म्हस्के हे दोघे बुधवारी रात्री गोविंद गंगा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आले होते. पेट्रोल भरल्यानंतर त्यांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला ५० रुपयांची फाटकी नोट दिली. फाटकी नोट असल्याने कर्मचाऱ्याने सदरील नोट परत केली; परंतु सलमान रहमत गुलखान पठाण याने सदरील नोट परत घेतली नाही. कर्मचारी त्याला म्हणाला की, नंतर पैसे दे. यानंतर दोघांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. सलमान रहमत गुलखान पठाण याने फोन करून २५ जणांना बोलवले. त्यानंतर पंपावरील चार कर्मचाऱ्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली, तसेच कर्मचाऱ्याजवळील १ लाख ५ हजार रुपये बळजबरीने हिसकावून नेले. पेट्रोल पंपाच्या कार्यालयात लपलेल्या एका कर्मचाऱ्याला मारण्यासाठी त्यांनी कार्यालयाचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. याची माहिती पंपचालक गोपाल बोराडे यांनी पोलिसांना दिली. असे असतानाही पोलीस घटनास्थळी उशिरा पोहोचले. याप्रकरणी उमेश गुलाब काळे यांच्या फिर्यादीवरून २५ जणांविरुद्ध मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक असमान शिंदे हे करीत आहेत.