गेल्या चार महिन्यांत पेट्रोल ६, डिझेल ७ असे एकूण १३ तर घरगुती गॅसच्या दरात १२५ रूपयांनी वाढ झाली आहे. १ नोव्हेंबर २०२० रोजी जालनात पेट्रोल ८८.७०, डिझेल ७६ .८१ तर गॅस ६९१ रूपयांवर होता. १ डिसेंबर २०२० रोजी पेट्रोल ८९.८५, डिझेल ७८.९३ तर गॅस ६६९ रूपयांवर होता. १ जानेवारीनंतर गॅस, पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. १ फेब्रुवारी रोजी पेट्रोल ९७.१४, डिझेल ८२.०६ तर घरगुती गॅस ७३५ रूपयांवर होता. पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच कच्च्या तेलाच्या किमंतीही गगनाला भिडल्या आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे कबंरडे मोडले आहे. गॅस महागल्याने सर्वसामान्य नागरिक चुलीचा वापर करताना दिसत आहे. वाढत्या महागाईमुळे अनेकांचे आर्थिक बजेटही कोलमडले आहे. आधीच कोरोनामुळे हैराण असलेल्या नागरिकांना आता महागाईचा फटका सहन करावा लागत आहे. याकडे केंद्र सरकारने लक्ष देण्याची गरज आहे.
सध्या पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याकडे केंद्र सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. वाढत्या महागाईमुळे आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमंडले आहे. कोरोनामुळे काही दिवस काम बंद होते. आता परिस्थिती पूर्वपदावर येत असताना पेट्रोल, डिझेल, आणि गॅसचा भडका उडाला आहे.
बालाजी ढोले, नागरिक
गेल्या काही महिन्यांपासून महागाई वाढली आहे. पेट्रोल व डिझेल तर काही दिवसांतच शंभरी पार करेल. त्यामुळे बाईकने प्रवास करण्यास अडचण निर्माण होत आहे. अच्छे दिन येणार असल्याचे आश्वासन देणाऱ्या सरकारने याकडे लक्ष द्यावे. सर्वसामान्यांचे नियोजन पूर्णपणे कोलमंडले आहे.
संदीप निकम, नागरिक
सुरूवातीला कोरोनामुळे सर्वसामान्यांचे हाल झाले. आता पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसचा भडका उडाला आहे. कुटुंबाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. या दरवाढीचा सर्वसामांन्या आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने दरवाढ मागे घ्यावी.
मुक्ता माने, गृहिणी