वृक्षारोपण : रोटरी ,इनरव्हील
रोट्रॅक्ट व चंदनझिरा ठाण्याचा उपक्रम
जालना : पूर्वी शंभर वर्षांनी वाढणारे जागतिक तापमान आता वर्षावर येऊन ठेपले असून, दरवर्षी एक ते दोन डिग्रीने तापमानात वाढ होत आहे. मानवाने प्रगतीचे टप्पे गाठत असतांना पर्यावरणाचा ऱ्हास केला. छोटे देश, बेट तर बुडण्याच्या टप्प्यावर आहेत. जगाचा ऱ्हास टाळायचा असेल तर रॅपिड पद्धतीने वृक्षारोपण करून वनसंपदा वाढविणे हाच एकमेव उपाय असल्याचे मत जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी येथे बोलताना केले.
रोटरी क्लब ऑफ जालना, इनरव्हील क्लब, रोट्रॅक्ट क्लब आणि चंदनझिरा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी औद्योगिक वसाहतीत आयोजित वृक्षारोपण सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी रोटरीच्या उपप्रांतपाल डॉ. सुमित्रा गादिया, रोटरी क्लबचे अध्यक्ष महेंद्र बागडी, सचिव अरुण मोहता, इन्हरव्हील क्लबच्या अध्यक्ष सविता लोया, सचिव छाया हंसोरा, प्रकल्प सहायक रामनिवास मानधनी, गोपाल मानधनी, प्रकल्प प्रमुख सुरेश मगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पोलीस अधीक्षक विनायक देशमुख पुढे म्हणाले, हजारो वर्षांपासून मानवाची उत्क्रांती होत असताना मानवाने निसर्गाकडून घेत प्रगतीचे टप्पे गाठले. परिणामी निसर्गाचा समतोल बिघडला. तो राखायचा असेल तर वृक्षलागवड करून न थांबता दोन वर्षांपर्यंत त्यांची निगा राखावी, असे आवाहन करत रोटरीच्या समाजोपयोगी कार्यात आमचा हिरिरीने सहभाग राहिल, अशी हमी देशमुख यांनी दिली.
सूत्रसंचालन सुरेश मगरे यांनी केले, तर सचिव अरुण मोहता यांनी आभार मानले. गतवर्षी मिया वॉकी प्रकल्पात सक्रिय सहभाग नोंदविल्या बद्दल कैलाश लोया, विष्णू चेचाणी, रवी झंवर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास फुलचंद भक्कड, श्रीनिवास भक्कड, सुनील भाई रायठठ्ठा, प्रवीण भाई भानुशाली, जगदीश राठी, सपोनि संदीप साळवे, पोउपनि. सुनील इंगळे, सपोउपनि निलेश कांबळे, पोहेकॉ. मन्सूब वेताळ, पांडुरंग वाघमारे, प्रभाकर वाघ, रेखा वाघमारे, संजय गुसिंगे, शिवाजी उबाळे, साई पवार, अनिल चव्हाण, कैलास बहुरे, चंद्रकांत माळी आदींची उपस्थिती होती.
वनमहोत्सव साजरा करण्याचा संकल्प
रोटरीचे अध्यक्ष महेंद्र बागडी यांनी वनराईस हिरवेगार करण्यासाठी हे वर्ष राहणार असल्याचे जाहीर केले. परिसरात दीडशे वृक्षांची लागवड करण्यात आली असून, सहा किलो वजनी ट्री गार्ड बसवले आहेत. लहान बालकांप्रमाणे वृक्षांचे जतन केले जाणार असून, वनमहोत्सव साजरा करण्याचा संकल्प महेंद्र बागडी यांनी व्यक्त केला.