पारडगाव : भिंतीला भगदाड पडल्याने भरलेला पाझर तलाव रिकामा झाल्याचा प्रकार पारडगाव शिवारात १९ जुलै २०२१ रोजी घडला होता. तलावाच्या भिंतीला पिचिंग नसल्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेले होते. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी गुरुवारी या तलावाची पाहणी केली.
घनसावंगी तालुक्यातील पारडगाव शिवारात १९९९ मध्ये जवळपास पंचवीस एकरावर या पाझर तलावाचे काम झाले होते. या पाझर तलावामुळे गावच्या पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला होता. यंदा पहिल्याच पावसात हा पाझर तलाव खूपच भरला होता. दुसऱ्या दिवशी भिंतीला भगदाड पडल्याने भरलेला पाझर तलाव पूर्ण रिकामा झाला. लघुपाटबंधारे विभागाने भिंतीला पिचिंग न केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार पाहता स्थानिक लघुपाटबंधारे विभागाने त्वरित लक्ष घालून भिंतीची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी पाहणी केली. यावेळी ज्युनिअर इंजिनिअर संभाजी लाखे, तलाठी संजय कुलकर्णी, शेतकरी खालेद कुरेशी, शब्बीर तांबोळी आदींची उपस्थिती होती.