वडीगोद्री : केंद्र सरकारने तयार केलेले शेतकरी कायदे हे भांडवलदार यांच्या हिताचे असल्याने हे शेतकरी कायदे रद्द होणे गरजेचे आहे. २० सप्टेंबर, २०२० हा दिवस शेतकऱ्यांच्या दृष्टीने काळा दिवस ठरला आहे. कारण या दिवशी अन्नदात्या शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे तीन विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले. ते शेतकरी कायदे केंद्र सरकारने रद्द केलेच पाहिजे, असे महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.अण्णाराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाच्या वतीने शेतकरी कायद्याच्या विरोधात शेतकरी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष बसवंतप्पा उबाळे, डॉ.सुरेश वाघमारे, उमर दाराज खान, मंचक डोने, अनिरुद्ध येचाळे, सुभाष लवटे, संतोष कोल्हे, बप्पासाहेब काळे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना पाटील म्हणाले, या जाचक शेतकरी कायद्याबद्दल कोणीही जास्त बोलायला तयार नाही. कारण जर कोणी विरोध केला, तर त्याला ईडीची भीती दाखविली जात आहे. एका अर्थाने देशात हुकूमशाही निर्माण झाली आहे. राज्यातही जे पक्ष आतापर्यंत विरोधात लढले ते आता सत्तेत सहभागी आहेत. त्यामुळे राजकीय नैतिकता ही रसातळाला गेलेली दिसून येत आहे. फक्त सत्तेत राहण्याच्या हव्यासापोटी जनतेच्या भावनांशी राजकीय पक्ष खेळत आहेत. देशातील ही सर्व परिस्थिती लोकशाहीसाठी अतिशय हानिकारक आहे. आम्ही कोणत्याही ईडीला घाबरत नाही. आमची काय चौकशी लावायची असेल ती लावावी, परंतु या केंद्र सरकारच्या जाचक शेतकरी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत राहणार. आवश्यक वस्तू साठेबाजी कायदा, शेतकरी किंमत हमी व कृषिसेवा करार कायदा, शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य कायदा ही सर्व कायदे अंबानी-आदानी व सहकारी यांच्या आर्थिक हितासाठी तयार करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचे कोणतेही हित समाविष्ट नाही. यावेळी अनिल गोएकर, विजय खूपसे, पंढरी जायनुरे, शशिकांत मतकर, शेखर बंगाळे, मारोती राठोड, यशवंत लवटे, अखिल देशमुख, चंद्रकांत हजारे, गणेश छेत्रे, राजेंद्र सुळ, ॲड.डी. आर. धैर्य, ॲड. माधव माडगे, विशाल कांबळे, दिग्विजय कांबळे, नाजम शेख, इस्माईल फुलारी आदी उपस्थित होते.