लोकमत न्यूज नेटवर्कजालना : राज्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक भागातील पिके शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत. आता आशा आहे ती विमा कंपनी आणि सरकारच्या मदतीची... मात्र जालना येथे सुरू असलेल्या विमा कंपनीच्या कार्यालयातील भोंगळ कारभारसमोर आला आहे. नुकसान भरपाई पोटी शेतक-यांनी पीकविमा कंपनीकडे सादर केलेले अर्ज कार्यालयातील केराच्या टोपलीत आणि पोत्यात दिसून आले. जालना येथील बडी सडकवरील बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात हा प्रकार समोर आला असून, कंपनीच्या निष्काळजीपणामुळे शेतकरी विम्यापासून, मदतीपासून वंचित राहिले तर जबाबरार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा कोरड्या दुष्काळानंतर आता ओल्या दुष्काळामुळे संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत बळीराजाला शासनाच्यावतीने पीक विम्याच्या स्वरूपात मदत देण्यात येते.यासाठी शासनाने खाजगी कंपन्यांची नियुक्ती केली आहे. परंतु, खाजगी कंपन्यांवर कोणाचेही लक्ष नसल्याने आपल्या मर्जीप्रमाणे काम करीत आहेत.सध्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे शासनातर्फे करण्यात येत आहे. तसेच विमा कंपनीमार्फत नुकसानीचा अर्ज शेतकºयांकडून भरून घेण्यात येत आहे.विमा भरल्याची पावती शेतक-यांना अर्जासोबत जोडावी लागत आहे. जालना शहरातील बडीसडक येथील बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात शेतकरी अर्ज भरण्यासाठी गर्दी करीत आहे. हजारो शेतकरी येथे दररोज अर्ज भरीत आहे.परंतु, नुकसान भरपाई पोटी शेतक-यांनी पिकविमा कंपनीकडे सादर केलेले अर्ज पोत्यात आणि केराच्या टोपलीत दिसून आल्याचा धक्कादायक प्रकार येथे पाहायला मिळाला.हे अर्ज एका हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. येथील एखादा अर्ज गहाळ झाला तर याला जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.विमा कंपनी कर्मचा-यांच्या चुकीने अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, ऐकीकडे पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी अर्थिक अडचणीत सापडले आहे. तर दुसरीकडे शेतक-यांनी मदतीसाठी सादर केलेल्या अर्जांचे हाल करून विमा कंपनी शेतक-यांच्या जखमेवर मीठ लावत असल्याचे दिसत आहे. याबाबत कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.प्रश्न : चूक कंपनीची तर नाही ना...?दरवर्षी शेतकरी पिकांचा विमा उतरवितात. सर्वच शेतकरी कागदपत्रांची पूर्तता करून विमा भरतात. परंतु, तरीही अनेक शेतकरी विम्यापासून वंचित राहतात. याबाबत कृषी विभागाकडेही शेतकरी तक्रार करतात. परंतु, कृषी विभागाकडूनही दखल घेतली जात नाही. विमा कंपन्या आशा प्रकारे कागदपत्रे ठेवत असतील तर कंपन्यांच्या चुकीमुळे शेतकरी विम्यापासून वंचित राहतात.
शेतकऱ्यांनी मदतीसाठी सादर केलेले अर्ज केराच्या टोपलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 01:06 IST