जामखेड : शासनाने नुकसान अनुदानासाठी तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. जाहीर केलेली ही मदत दिवाळीपूर्वी मिळणे गरजेचे होते. मात्र, जामखेड व परिसरातील शेतकऱ्यांना अद्यापही या मदत अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे.
यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जिरायत जमीन हेक्टरी दहा हजार रुपये, बागायती वीस हजार रुपये, फळबागायती पंचवीस हजार रुपये अशी मदत दिवाळीपूर्वीच देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, जामखेड येथील शेतकऱ्यांना दिवाळीनंतर दीड महिना उलटूनही शासनाने घोषित केलेली मदत मिळालेली नाही. अस्मानी संकटांमुळे या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. घोषित केलेली मदत मिळत नसल्याने शासनाने केवळ तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. मदतीसाठी शेतकऱ्यांच्या संबंधित बँक शाखेतही चकरा सुरू आहेत. मात्र, आज-उद्या या उत्तरामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
आमच्याकडे बारा वाड्या आणि जामखेड अंतर्गत व्यवहार चालतो. सध्या इतर वाड्यांच्या नुकसान अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. जामखेडचे अनुदान किंवा याद्या आमच्याकडे आलेल्या नाहीत.
आर. बी. भुसारे
शाखा व्यवस्थापक, जिल्हा बँक, जामखेड
शेतकऱ्यांचे अस्मानी संकटांमुळे मोठे नुकसान झाले आहे. रबी हंगामातही अस्मानी संकटांचा फेरा सुरू आहे. त्यात शासनाने जाहीर केलेली मदतही तुटपुंजी आहे. आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे वाटप करण्याची गरज आहे.
कुणाल चौहाण
शेतकरी, जामखेड