मंठा : राज्य सरकारच्या ग्रामविकास खात्याने कोरोनामुक्त गाव ही योजना उदयास आणली आहे. आपले गाव कोरोनामुक्त करण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शासनाने ग्रामपंचायतीसाठी पारितोषिक जाहीर केले आहे. यातील पहिल्या क्रमांकाचे एक कोटी रुपयांचे पारितोषिक मिळण्याच्या उद्देशाने नायगाव ग्रामपंचायतीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. यासाठी पाच पथकांची स्थापना केल्याची माहिती सरपंच गजानन फुपाटे यांनी दिली.
यात प्रभागनिहाय कुटुंब सर्वेक्षण, विलगीकरण कक्ष व कारवाई, रुग्णालयांसाठी वाहनचालक, कोविड हेल्पलाइन व लसीकरण आदी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या संपूर्ण पथकाच्या माध्यमातून गाव कसे कोरोनामुक्त होईल, यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. गृहभेट, शिबिरे आदी कार्यक्रम ग्रामपंचायतीमार्फत केले जात आहेत. या संपूर्ण पथकाला ग्रामस्थांचे सहकार्य मिळत असून, गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत शासनाने जाहीर केलेले पारितोषिक मिळविण्याचे उद्दिष्ट ग्रामस्थांनी ठेवले आहे. त्यातून मिळणाऱ्या पैशातून विकास करण्याचा मानस असल्याचे उपसरपंच अविनाश राठोड यांनी सांगितले.