नाला परिसरात पालिकेकडून स्वच्छता
परतूर : शहरातून वाहणाऱ्या लेंडी नाला परिसरात नगर पालिकेकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या स्वच्छता मोहिमेमुळे परिसरात सुटलेली दुर्गंधी कमी होणार आहे. नगर पालिकेने याचप्रमाणे शहरातील विविध भागात नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
ढगाळ वातावरणामुळे गहू, हरभरा धोक्यात
भोकरदन : गत काही दिवसांपासून तालुका व परिसरात ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बीतील गहू, हरभऱ्यासह इतर पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या भागातील अनेक शेतकरी महागडी औषधे फवारणी करीत असल्याचे दिसून येत आहे.
शहर परिसरात अवैध गुटखा विक्री जोमात
भोकरदन : शासनाने गुटखा विक्रीवर निर्बंध घातले आहेत. परंतु, शहरासह परिसरातील पानटपऱ्यांसह दुकानांमध्ये अवैधरित्या गुटख्याची विक्री सुरू आहे. शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा आणला जात असला तरी याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.