जालना : जिल्हा रुग्णालयाच्या विविध विभागांतील वायरिंग शेतशिवारातील वायरिंगप्रमाणे मोकळ्या आहेत. विशेषत: सोनोग्राफी विभागाजवळील फ्यूजबॉक्सही उघडा ठेवण्यात येतो. त्यामुळे स्वच्छता करताना या बॅक्समध्ये पाणी गेले किंवा एखादा पक्षी बसला तर अपघात होण्याची शक्यता आहे.
भंडारा येथील घटनेनंतर शासनस्तरावरून रुग्णालयांचे इलेक्ट्रिक, फायर ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जालना येथील जिल्हा रुग्णालयात काही वर्षांपूर्वी मॉकड्रील घेण्यात आले, परंतु इलेक्ट्रिक ऑडिट, फायर ऑडिट वेळेवर झालेले नाही. केवळ महिला रुग्णालयाचे दीड वर्षांपूर्वी ऑडिट झाले आहे, तर जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांचे इलेक्ट्रिक ऑडिट, फायर ऑडिट वेळेवर झालेले नाही. ऑडिटबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी सूचित करूनही संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. दुसरीकडे महिला रुग्णालयाच्या इमारतीतील स्प्रिंकलर पाईप यंत्रणेचे कामही बांधकाम विभागाने अर्धवट सोडले आहे.
पाहणीत काय आढळले ?
जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतील वायरिंग कोठेही सुरळीत नाही. आंतररुग्ण विभागा, सोनोग्राफी विभाग परिसरच नव्हे, तर अधिकारी, कर्मचारी ज्या कार्यालयात काम करतात तेथेही वायरिंग व्यवस्थित नाहीत. अनेक ठिकाणी वायरिंग भिंतीवरच लोंबकाळत आहे. विशेषत: अनेक ठिकाणी वायरिंग लोंबकळताना दिसून येतात.
ऑडिट न करण्यास जबाबदार कोण ?
कार्यालय प्रमुखांनी जिल्हा रुग्णालयासह स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाचे इलेक्ट्रिक ऑडिट, फायर ऑडिट वेळोवेळी करणे गरजेचे आहे. हे ऑडिट वेळेत झाले नाही, तर वरिष्ठ स्तरावरून संबंधितांवर प्रशासकीय कारवाई केली जाऊ शकते.
सर्वच रुग्णालयांच्या ऑडिटची प्रक्रिया सुरू
जिल्हा रुग्णालयात दोन वेळेस मॉकड्रील करण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक, फायर ऑडिटही झाले होते. आता पुन्हा नव्याने इलेक्ट्रिक, फायर ऑडिट करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. शिवाय जिल्ह्यातील कार्यालय प्रमुखांनाही ऑडिट करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
- डॉ. अर्चना भोसले
जिल्हा शल्यचिकित्सक
जिल्हा रुग्णालयाच्या ओपीडीत आल्यानंतर अनेकवेळा डॉक्टर नसल्याचा अनुभव आला आहे, तर अनेकवेळा औषधांच्या तुटवड्याचाही सामना करावा लागला. त्यात या रुग्णालयातील विविध विभागांतील वायरिंग या कोठेही लोंबकाळणाऱ्या दिसून येतात. भंडाऱ्यातील घटना पाहता येथील वायरिंगचे काम करणे गरजेचे आहे.
- सुभाष बोरडे
-जालना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात अनेक आधुनिक यंत्रणा आल्या आहेत. असे असले तरी रुग्णालयात गेल्यानंतर एक ना अनेक समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागतो. त्यात रुग्णालयातील वायरिंगची स्थिती पाहिल्यानंतर भीती निर्माण होते. स्त्री रुग्णालयातही अशा समस्या काही वेळेस जाणवतात. या समस्या दूर करण्याची गरज आहे.
- कमल तुल्ले
जालना