लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनी शनिवारी सकाळी अचानक प्रत्येक विभागात जावून हजेरी रजिस्टर तपासले. या वेळी १८ कर्मचारी गैरहजर आढळून आले. लेटलतीफ व गैरहजर १४ कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याच्या सूचना अध्यक्षांनी दिल्या आहेत.जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर हे सकाळी साडेदहा वाजता कार्यालयात पोहोचले. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच त्यांनी इमारतीत आत येण्यासाठीचे सर्व दरवाजे बंद करणाच्या सूचना दिल्या. सर्वप्रथम पंचायत व सामान्य प्रशासन विभागात जावून कर्मचा-यांच्या उपस्थितीबाबत हजेरी रजिस्टर, दौरा रजिस्टर, हालचाल रजिस्टरची पाहणी केली. या वेळी पंचायत व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी राजेश इंगळे व निखिल ओसवाल व अन्य कर्मचारी उपस्थित असल्याचे आढळून आले. त्यानंतर अध्यक्षांनी आपला मोर्चा दुस-या मजल्याकडे वळविला. प्रत्येक विभागात जाऊन कर्मचा-यांची मोजणी केली. रजा, दौरा, कार्यालयीन कामकाज यासाठी गेलेल्या कर्मचा-यांच्या नोंदी तपासल्या. या वेळी शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, सिंचन, सामान्य प्रशासन, आरोग्य आदी विभागातील कर्मचारी गैरहजर आढळून आले. या विभागातील कार्यालयीन अधीक्षक व विभाग प्रमुखांना त्यांनी चांगलेच सुनावले. तपासणीत गैरहजर कर्मचा-यांना नोटीस देण्याच्या सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी इंगळे यांना दिल्या. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, अशोक आडेकर, स्वीय सहायक नारायण कावळे, अमृत पाटील यांची उपस्थिती होती.
अठरा कर्मचारी गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 01:30 IST