गजेंद्र देशमुख , जालनायेथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असणाऱ्या आंबा निर्यात सुविधा केंद्रास यंदा पडलेला दुष्काळ व अवकाळी पाऊस यामुळे मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. आंब्याच्या अत्यल्प उत्पादनामुळे निर्यातीत घट येण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.मराठवाड्यातील केशर आंबा उत्पादकांना परदेशात आंबे पाठविता यावेत, म्हणून पाच ते सहा वर्षांपूर्वी येथे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने आंबा निर्यात सुविधा केंद्र सुरु करण्यात आले. येथील केशर आंबा युरोपीय देशात निर्यात केला जातो. दरवर्षी २० टनांच्या आसपास आंबा निर्यात केला जातो. यंदा हे प्रमाण अर्ध्यापेक्षाही कमी होणार आहे. या केंद्रातंर्गत जालना, बीड व औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आंबा निर्यात करु शकतात. परदेशात आंबा पाठविण्यासाठी येथे २५ मेट्रिक टन क्षमतेचे दोन सुसज्ज केंद्र आहेत. परदेशात निर्यात करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व निकष येथे पाळले जातात. शीतगृह, पॅकिंग हाऊस ,प्रत वारी करण्यासाठी मशीन्स केंद्रात आहेत. गतवर्षी मे व जून अखेर २५ टन आंबा अमेरिकेसह इतर युरोपिय देशांत निर्यात झाला होता.मराठवाड्यात उत्पादित होणाऱ्या चविष्ट अशा केशर आंब्यास मोठी मागणी आहे. या आंब्याची चव विदेशातील जनतेला चाखता यावी म्हणून आंबा निर्यात सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. निर्यातदार व शेतकरी यांच्या दराबाबत करार होऊन आंबा मागणी आलेल्या देशात पाठविला जातो. आंबा निर्यातीतून शेतकऱ्यांनाही चांगला आर्थिक फायदा होत आहे.याविषयी निर्यात सुविधा केंद्रातील अधिकारी कांबळे म्हणाले की, दुष्काळ व अवकाळी पाऊस यामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले.परिणामी अद्यापपर्यंत केंद्रात निर्यातक्षम आंबा दाखल झालेला नाही. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी निर्यात कमी होईल. जून महिन्यात आंबा निर्यात होण्याचा अंदाज कांबळे यांनी व्यक्त केला. गतवर्षी केशर आंब्याचे उत्पादन चांगले झाले होते. या केंद्रात निर्यातीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा येथे उपलब्ध आहेत. उच्च दर्जाची तपासणी करुन येथून आंबे निर्यात केले जातात.
आंबा निर्यात केंद्रालाही दुष्काळाचा फटका
By admin | Updated: May 23, 2015 00:38 IST