कुंभारी परिसरात पिकांचे नुकसान
भोकरदन : भोकरदन तालुक्याच्या दक्षिण भागातील कुंभारी व परिसरात शनिवारी झालेल्या पावसामुळे गहू व मका पिकांचे नुकसान झाले असून, या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी होत आहे. भोकरदन तालुक्याच्या दक्षिण भागातील कुंभारी, सोयगाव देवी, कोपर्डा, निमगाव आदी भागांत शनिवारी सायंकाळी व रात्री जोरदार पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मकर संक्रांतीसाठी बाजारपेठ फुलली
मंठा : मकर संक्रांत सण दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारापेठेत खण, त्याच्याबरोबर विविध प्रकारचे वाण, तिळगूळ, बांगड्या आदी साहित्यांनी मोठ्या प्रमाणात बाजारपेठ फुलली आहे. महिलांनी खरेदीसाठी बाजारपेठेत मोेठी गर्दी केली आहे.
शहर परिसरात अवैध गुटखा विक्री जोमात
घनसावंगी : शासनाने गुटखा विक्रीवर निर्बंध घातले आहेत. परंतु, शहरासह परिसरातील पानटपऱ्यांसह दुकानांमध्ये अवैधरित्या गुटख्याची विक्री सुरू आहे. शहरात मोठ्या प्रमाणात गुटखा आणला जात असला तरी याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बदनापूरच्या विद्यार्थ्यांचे मॅरेथॉन स्पर्धेत यश
जालना : बदनापूर येथील ट्विंकल स्टार स्कूलच्या विद्यार्थ्यांनी औरंगाबाद येथे झालेल्या रोलर मॅरेथॉन स्पर्धेत यश संपादन केले आहे. या स्पर्धेत प्रियशा प्रशांत गाडगे व डोना गोपाल बराई यांनी सहभाग घेऊन रजत पदकाची कमाई केली. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दत्ताभाऊ पाथ्रीकर, प्राचार्या डॉ. एम. डी. पाथ्रीकर, डॉ. देवेश पाथ्रीकर, मुख्याध्यापिका अमेना सय्यद, विद्या चित्रे, नारायण लव्हाळे आदींनी कौतुक केले.
प्रदेशाध्यक्षपदी पद्माकर चंदनशिवे
जालना : आजी-माजी सैनिकांसाठी काम करणाऱ्या त्रिदल सैनिक संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी राजूर येथील माजी कमांडो पद्माकर चंदनशिवे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्षांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीबद्दल उपाध्यक्ष अनिल खाकशे, तुकाराम डफळ, संपत दिघे, जहीर पठाण, संतोष चराटे यांनी स्वागत केले.
जिल्हा कार्यकारिणी जाहीर
जालना : बारा बलुतेदार समाज विकास संघाची जालना जिल्हा कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. अध्यक्षपदी संदीप बोदरवाल, सचिवपदी गंगाधर पंडित तर उपाध्यक्षपदी विष्णू बोंद्रे यांची निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी, प्रदेश सचिव राजेंद्र पंडित, प्रदेश संपर्कप्रमुख सचिन उदावंत, उत्सव प्रमुख रोहित यवतकर यांनी निवड केली. या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत केली जात आहे. उर्वरित कार्यकारिणीची लवकरच निवड केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
विस्कळीत सेवा सुरळीत करण्याची मागणी
अंबड : शहरासह ग्रामीण भागातील दूरसंचारची सेवा पूर्णत: विस्कळीत झाली आहे. एकमेकांशी संपर्क साधताना अडचणी येत असून, इंटरनेट सेवेचाही फज्जा उडाला आहे. याकडे दूरसंचारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवून सेवा सुरळीत करावी, अशी मागणी ग्राहक वर्गातून केली जात आहे. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.